धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 06:00 AM2019-11-20T06:00:00+5:302019-11-20T06:00:19+5:30
खरीप हंगामाच्या उत्पादित धानपिकाची खरेदी सुरु झाली आहे. धान खरेदी केंद्रांवर शेतकºयांची लूट केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. निसर्गाच्या कोपामुळे आधीच हवालिदल झालेला शेतकरी कंगाल तर संस्थाचालक मालामाल होत आहेत. यंत्रणा मात्र घोंगडे पांघरूण झोपेचे ढोंग करीत असल्याचा प्रकारही पुढे आला.जिल्ह्यात आधारभूत हमीभावाने शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यासाठी जिल्हा पणन अधिकारी व आदिवासी महामंडळ अशा दोन मुख्य एजन्सी आहेत.
संतोष बुकावन।
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : जिल्हाधिकाऱ्यांनी खरीप हंगामातील धान खरेदी करतांना खरेदी केंद्रासाठी एक नियमावली तयार केली आहे.यानुसार शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, आदिवासी विकास महामंडळाला दिले. याचे खरेदी केंद्रावर कितपत पालन केले जात आहे, धान खरेदी करणारी यंत्रणा किती सजग आहे आणि खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची कशी लूट केली जात आहे. यासर्व गोष्टींची चाचपणी लोकमतने मंगळवारी (दि.१९) धान खरेदी केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन स्टिंग ऑपरेशन केले.त्यात अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या.
खरीप हंगामाच्या उत्पादित धानपिकाची खरेदी सुरु झाली आहे. धान खरेदी केंद्रांवर शेतकºयांची लूट केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. निसर्गाच्या कोपामुळे आधीच हवालिदल झालेला शेतकरी कंगाल तर संस्थाचालक मालामाल होत आहेत. यंत्रणा मात्र घोंगडे पांघरूण झोपेचे ढोंग करीत असल्याचा प्रकारही पुढे आला.जिल्ह्यात आधारभूत हमीभावाने शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यासाठी जिल्हा पणन अधिकारी व आदिवासी महामंडळ अशा दोन मुख्य एजन्सी आहेत.
जिल्हा पणन अधिकारी यांनी खरीप हंगामातील आधारभूत किंमत धान खरेदी योजना ४ नोव्हेंबरच्या पत्रानुसार सुरू केली आहे. आदिवासी विकास महामंडळाचे अर्जुनी मोरगाव तालुक्यात केशोरी हे एकमेव केंद्र वेळेवर सुरू झाले. गोठणगाव, ईळदा हे केंद्र १६ नोव्हेंबर रोजी सुरू झाले. बाराभाटी हे केंद्र अद्याप सुरू न होण्यामागील कारण गुलदस्त्यात आहे. यामुळे परिसरातील शेतकºयांची मात्र पुरती कोंडी होत आहे. हे केंद्र लवकर सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
धान खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब होत असल्याने उसनवारी करून दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे मात्र दिवाळे निघाले.वातानुकूलित खोलीत बसून निर्णय घेणारी यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प आहे. जिल्हा पणन अधिकारी यांचे अंतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यात विविध कार्यकारी सेवा सह संस्था अर्जुनी, लक्ष्मी भात गिरणी अर्जुनी, खरेदी विक्री संस्था अर्जुनी, नवेगावबांध, महागाव, वडेगाव, बोंडगावदेवी, धाबेटेकडी व बाकटी असे धान खरेदी केंद्र आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्याला धानाचे कोठार म्हणून ओळखले जाते.जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे उत्पादन याच तालुक्यात होते.
एका वर्षात साधारणत: सव्वा दोन लक्ष क्विंटल धानाचे उत्पादन होते. यावर्षी खरीप हंगामात धान कापणी झाल्यावर अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले.जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी केली. अद्याप मदत मिळाली नाही.त्यातही शेतकऱ्यांच्या नावाने असलेल्या धान खरेदी करणाºया काही संस्था शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खात आहेत.
ईलेक्ट्रानिक नव्हे साध्या वजन काट्यावर मोजमाप
बोरी येथे सुरू असलेल्या केंद्रावर साध्या वजन काट्याने मोजमाप होत आहे. याठिकाणी इलेक्ट्रॉनिक वजन काट्याने खरेदी सुरू असल्याचे खरेदी विक्र ी समिती सांगत आहे. इलेक्ट्रॉनिक वजनकाटे वारंवार चार्जिंग करावे लागते हा बहाणा धान खरेदी केंद्राचालक सांगण्यास विसरत नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांचे कसे उल्लघंन केले आहे हे सुध्दा उघडकीस आले.
ओलाव्याच्या नावावर अडीच किलो धानाची कपात
ओलाव्याच्या नावावर बोरी केंद्रावर ४० किलोमागे चक्क दोन ते अडीच किलो अधिक धान शेतकऱ्यांकडून घेतले जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा प्रकार अजिबात नवीन नाही मात्र शेतकरी मुकाट्याने सहन करतात ही खरी शोकांतिका आहे. या प्रकारातून संस्था पाहिजे तेवढ्या मोठ्या झाल्याचे दिसून येत नाही. मात्र काही संस्थाचालक गब्बर झाले आहेत.दरवर्षी जिल्ह्यात होणारा हा सर्वात मोठा घोटाळा आहे.
अधिकारी, कर्मचारी नावापुरतेच
धान खरेदी केंद्रावर कुठलाही गैरप्रकार होऊ नये,यासाठी दक्षता पथके आणि अधिकारी कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.मात्र खरेदी केंद्रावर सर्रापणे नियमांचे उल्लघंन केले जात असल्याने नावापुरते देखरेखीसाठी पणन विभागाचे कर्मचारी नियुक्त असतात. त्यांच्या डोळ्यात धूळ झोकून हा प्रकार केला जात आहे. मांजरीसारखे डोळे मिटून दूध पिण्यातच ते धन्यता मानतात.
अशी होतेय केंद्रावर लूट
अर्जुनी मोरगाव तालुक्यात काही धान खरेदी केंद्रांवर साध्या वजन काट्यावर धान मोजणी केली जाते. इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे असतांना साध्या काट्यावर मोजणी का हाच खरा संशोधनाचा विषय आहे. इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यातही सेटिंग केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. धानाचा कट्टा ४० किलोचा असतो.तो मोजणी करतांना तोलारी ४१ ते ४२ किलो वजन घेतात. एका कट्याच्या मोबदल्यात दोन कट्टे मांडतात शिवाय कट्टा जमिनीला टेकेल एवढे झुकते माप घेतले जाते.४० किलोच्या कट्टयावर एक किलो पासंग गृहीत धरले तर एका क्विंटलवर अडीच किलो अधिकचे माप घेतले जाते.
ओलाव्याच्या नावावर शेतकऱ्यांना धरले जाते वेठीस
ओलाव्याचे प्रमाण अधिक असल्याचे कारण सांगून धान परत न्या व पुन्हा वाळवून नंतर खरेदी केंद्रावर आणा असेही ग्रेडरांकडून शेतकºयांना सांगितले जात असल्याच्या तक्रारी आहेत. ते शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नसते.म्हणजे शेतकऱ्यांनी वाहतुकीचा खर्च करून शेतातून केंद्रापर्यंत धान आणायचे.पुन्हा केंद्रावरून उचल करून घरापर्यंत नेण्यासाठी वाहतूक खर्च करायचा व वाळविल्यानंतर पुन्हा केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहतूक खर्च करायचा. एवढा खटाटोप करण्यास सांगितले जाते. कोंडीत पकडल्यानंतर शेतकरी हा उपद्व्याप टाळण्यासाठी ग्रेडरकडून होणाºया अन्यायाला बळी बळी पडत असल्याचे चित्र पाहयला मिळाले.
कमाई कुणाच्या घशात
शासकीय धान खरेदी केंद्रावर लाखों रुपयांच्या कमाईची उलाढाल या व्यवसायातून केली जाते. जे कर्मचारी सावळागोंधळ करतात ते बदनाम होतात मात्र ही कमाई संस्थाचालकांच्या घशात जात असल्याची ओरड आहे. संस्था ओलावा म्हणून शेतकऱ्यांकडून अधिक वजन घेतात व ओलाव्याची तूट म्हणून शासनाकडेही मागणी करतात असा आरोप बाजीराव तुळशीकर यांनी केला आहे.