पॅन कार्ड तयार करुन देण्याच्या नावावर लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 10:25 PM2018-03-01T22:25:30+5:302018-03-01T22:25:30+5:30
शासनाने विविध कामांसाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड अनिवार्य केले आहे. ही दोन्ही कागदपत्रे नसल्यास काम पुढे सरकत नाही.त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिक पॅन कार्ड तयार करण्यासाठी धडपड करीत आहे.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : शासनाने विविध कामांसाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड अनिवार्य केले आहे. ही दोन्ही कागदपत्रे नसल्यास काम पुढे सरकत नाही.त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिक पॅन कार्ड तयार करण्यासाठी धडपड करीत आहे. नेमक्या याच संधीचा फायदा घेत जिल्ह्यात पॅन कार्ड तयार करुन देण्याचे आमीष दाखवून नागरिकांची लूट केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पॅन कार्ड तयार करुन देणाºया कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगून गावा गावात पोहचून गावकºयांकडून अर्ज भरुन दोनशे ते तीनशे रुपयांचे शुल्क वसुल केले जात आहे. संबंधित प्रतिनिधीकडून अर्ज केल्यानंतर पंधरा ते वीस दिवसात पॅन कार्ड तुमच्या घरी पोहचेल असे सांगितले जात आहे. मात्र महिनाभराचा कालावधी लोटून देखील पॅन कार्ड न आल्याने संबंधित प्रतिनिधीनी दिलेल्या कंपनीच्या पत्यावर गेले. मात्र तिथे गेल्यानंतर संबंधित प्रतिनिधी त्यांच्या कंपनीचे नसल्याचे सांगण्यात आले. तेव्हा या गावकºयांच्या आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येत. हा प्रकार तिरोडा तालुक्यातील काही गावात सुरू असल्याची माहिती आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पॅन कार्ड तयार करण्यासाठी जिल्हा किंवा तहसील स्तरापर्यत धावपळ करावी लागू नये, यासाठी शासनाने पॅन कार्ड तयार करुन देण्यासाठी काही कंपन्याना परवानगी दिली आहे. या कंपन्या गावा गावात पॅन कार्ड तयार करण्याचे शिबिर घेत आहे. कोणत्याही जिल्ह्यात शिबिर घेण्यापूर्वी या कंपनीला जिल्हाधिकाºयांकडून परवानगी घ्यावी. शासनाने संबंधित कंपनीला पॅन कार्ड तयार करुन देण्याचे प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात. त्यानंतरच त्यांना शिबिर घेता येते. ज्या गावात शिबिर घ्यायचे आहे त्या गावातील सरपंच व ग्रामसेवकांना पत्र देऊन परवानगी घ्यावी लागते. पॅन कार्ड तयार करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केवळ एकाच कंपनीला मंजुरी दिल्याची माहिती आहे. मात्र जिल्हा प्रशासनाची परवानगी न घेता काही बोगस प्रतिनिधी सध्या जिल्ह्यात पॅन कार्ड तयार करुन देण्याचे काम करीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करुन संबंधितावर कारवाही करण्याची गरज आहे.
कंपनीच्या अर्जांची झेरॉक्स
पॅन कार्ड तयार करुन देण्याच्या नावावर काही बोगस प्रतिनिधी परवानगी असलेल्या कंपनीच्या अर्जांची झेरॉक्स करुन ते पॅन कार्ड तयार करण्यासाठी भरुन घेत आहे. तसेच त्यासाठी शुल्क घेत आहे. मात्र जेव्हा नागरिक दिलेली मुदत झाल्यानंतर संबंधित कंपनीच्या पत्तावर पोहचल्यानंतर त्यांना सदर अर्ज त्यांच्यापर्यंत पोहचलेच नसल्याचे सांगितले जात आहे. तेव्हा नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येत आहे.
या गोष्टींची करा चाचपणी
आपल्या गावात कोणत्या कंपनीचे प्रतिनिधी पॅन कार्ड तयार करुन देण्यासाठी आले तर आधी त्यांच्याकडे अधिकृत कंपनी असल्याची कागदपत्रे, संबंधित कंपनीच्या कार्यालयाचा पत्ता, ओळखपत्र या गोष्टींची चाचपणी करा. त्यानंतर अर्ज भरून द्या. सरपंच व सचिवांनी देखील या गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे.
महत्त्वपूर्ण दस्तावेज
सध्या कुठल्याही शासकीय कामांसाठी आधार व पॅनकार्ड महत्त्वाचे आहे. ही दोन कागदपत्रे असली की बँकेत खाते, सीम कार्ड तसेच इतर कामे देखील सहजपणे होतात. त्यामुळे हे दस्तावेज महत्त्वपूर्ण आहेत. यामुळे सुरक्षेचा देखील प्रश्न निर्माण होवू शकतो.