बिरसी येथील आंदोलनाची प्रधानमंत्री कार्यालयाकडून दखल ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:29 AM2021-03-16T04:29:57+5:302021-03-16T04:29:57+5:30
गोंदिया : मागील दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या तालुक्यातील ग्राम बिरसी येथील सुरक्षा रक्षकांच्या आंदोलनाची दखल अखेर प्रधानमंत्री कार्यालयाकडून ...
गोंदिया : मागील दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या तालुक्यातील ग्राम बिरसी येथील सुरक्षा रक्षकांच्या आंदोलनाची दखल अखेर प्रधानमंत्री कार्यालयाकडून घेण्यात आली आहे. प्रधानमंत्री कार्यालयाकडून संघटनेला पत्र पाठविण्यात आले आहे. तसेच या सुरक्षा रक्षकांच्या मागण्या तातडीने सोडविण्यासाठी विमानतळ अधिकाऱ्यांना या पत्रातून निर्देश देण्यात आले आहेत.
१३ वर्षे काम करूनही बिरसी येथील नागरिकांना विमानतळ प्रशासनाने कामावरून कमी केले आहे. आपल्याला पुन्हा कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी येथील सुरक्षा रक्षक मागील दीड महिन्यांपासून विमानतळ गेट समोर आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत आंदोलनाला बसलेले आहेत. या आंदोलनाची अद्यापही दखल जिल्हा व विमानतळ प्रशासनाने घेतली नाही. एवढेच नव्हे तर या आंदोलनाला आतापर्यंत जिल्ह्यातील आमदार, खासदार तसेच अनेक संघटनांच्यावतीने भेटी देऊन समर्थन देण्यात आले. परंतु अद्यापही सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांसंदर्भात तोडगा काढण्यात आला नाही. हा प्रश्न तातडीने मार्गी लावून त्याची सोडवणूक करावी व सुरक्षा रक्षकांवर झालेला अन्याय दूर करावा अशी मागणी सुरक्षा रक्षकांनी पंतप्रधान कार्यालयाकडे केली होती. तसेच जिल्हा व विमानतळ प्रशासन सुरक्षा रक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अपयशी ठरत असल्यामुळे त्यांनी राष्ट्रपतींकडे इच्छा मृत्यूची मागणी सुद्धा केली होती हे विशेष. अखेर दीड महिन्यांनंतर प्रधानमंत्री कार्यालयाने या सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांची दखल घेत त्यांना ताबडतोब न्याय देण्यात यावा व या प्रश्नांची त्वरित सोडवणूक करावी असे निर्देश विमानतळ अधिकाऱ्यांना दिले आहेत. देशाच्या प्रमुख कार्यालयाने दिलेल्या आदेशानंतर विमानतळ व जिल्हा प्रशासनातील अधिकारी हे किती दिवसांत सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून देतात की प्रधानमंत्री कार्यालयाच्या पत्रालाही केराची टोपली दाखवितात याकडे लक्ष लागले आहे.
......