नवेगाव व्याघ्र प्रकल्पात दुर्मिळ काळ्या बिबट्याची शिकार; २१.५० लाख रोख व वन्यप्राण्यांचे अवयव जप्त
By नरेश रहिले | Published: March 1, 2023 05:05 PM2023-03-01T17:05:18+5:302023-03-01T17:06:07+5:30
Nagpur News महाराष्ट्रात काळ्या बिबट्याचे अस्तित्व दुर्मिळ असतानाच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील काळ्या बिबट्याची १३ जानेवारी २०२३ रोजी शिकार केल्याची कबुली २६ फेब्रुवारी रोजी देवरी तालुक्यातील मंगेझरी येथे अटक केलेल्या पाच आरोपींनी दिली आहे.
नरेश रहिले
गोंदिया : महाराष्ट्रात काळ्या बिबट्याचे अस्तित्व दुर्मिळ असतानाच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील काळ्या बिबट्याची १३ जानेवारी २०२३ रोजी शिकार केल्याची कबुली २६ फेब्रुवारी रोजी देवरी तालुक्यातील मंगेझरी येथे अटक केलेल्या पाच आरोपींनी दिली आहे. आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे काळ्या बिबट्याचे अर्धवट जळालेले हृदय वनविभागाने जप्त केल्याची माहिती नागझिरा-नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी प्रदीप पाटील यांनी दिली.
गोंदिया जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी व विक्री होणार असल्याची खात्रीलायक गुप्त माहिती विशेष व्याघ्र संरक्षण दल व नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांना मिळाली होती. व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी व पोलिस विभाग,गोंदिया यांना एक महिन्याच्या प्रयत्नानंतर पाच आरोपींना पकडण्यात यश आले. २६ फेब्रुवारी रोजी आरोपी शामलाल ढिवरू मडावी, दिवारू कोल्हारे, माणिक दारसू ताराम, अशोक गोटे, सर्व रा. मंगेझरी,पो. मुरदोली,ता. देवरी व रवींद्र लक्ष्मण बोडगेवार, रा. पालांदूर ता. देवरी या आरोपींनी मंगेझरी येथे १३ जानेवारी रोजी काळ्या बिबट्याला फासात अडकवून त्याची शिकार केली. या पाचही आरोपींनी याची तपासादरम्यान कबुली दिली. त्यानंतर या शिकार प्रकरणाचे बिंग फुटले. आरोपींकडून आणखी मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ही कारवाई नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जयरामेगौडा आर., पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, विभागीय वनअधिकारी प्रदीप पाटील, देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर, नवेगाव वन्यजीव अभयारण्याचे सहायक वनसंरक्षक रोशन राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी, संरक्षण पथक संजय मेंढे, पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, सहायक पोलिस निरीक्षक विजय शिंदे, चिचगडचे ठाणेदार शरद पाटील, सहायक पोलिस निरीक्षक मुरूडकर, नरेंद्र सावंत यांनी केली आहे.
हे साहित्य केले जप्त
वाघ किंवा बिबट या मांजर कुळातील वन्यप्राण्याचे दात २, नख १,अस्वलाची नखे ३, रानडुक्कर सुळे १०, चितळाचे शिंग १, सायाळ प्राण्याचे काटे, खवल्या मांजराचे खवले २, ताराचे फासे, जिवंत मोर १, मोरपिस ५ बंडल, रानगव्याचे शिंग १, जाळे, सुकलेली हाडे, रक्त पापडी (झाडाची साल), सुकवलेले मास, देशी दारू पेटी अंदाजे किंमत ८४ हजार रुपये, रोख रक्कम २१ लाख ४९ हजार ४४० रुपये जप्त करण्यात आले.
व्हिडिओ झाला होता व्हायरल
काळा बिबट फासात अडकल्याचा व्हिडीओ १४ जानेवारीला व्हायरल झाला होता. तो काही लोकांपर्यंत पोहोचल्याने वनविभागाने वेळीच हे प्रकरण पुढे येऊ दिले नसल्याची चर्चा आहे. परंतु आता अटक झालेल्या आरोपींनी या काळ्या बिबट्याच्या शिकारीची कबुली दिल्याने तो व्हिडिओ खरा असल्याचे वनाधिकारी सांगतात.
कॅमेऱ्यात तो बिबट झाला होता कैद
नागझिरा-नवेगाव टायगर रिझर्व्ह क्षेत्र ६५० चौरस किलोमीटर आहे. ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. ब्लॅक लेपर्ड हा आपल्या सोबत्यासह फिरताना ट्रॅप कॅमेऱ्याने टिपले आहे. या कॅमेऱ्यात झालेल्या नोंदी डब्ल्यूआयआयकडे व भारतीय वन्यजीव संस्थेकडे पाठविल्या जातात. भारतीय वन्यजीव संस्थेतील वैज्ञानिक बिलाल हबीब यांनी ट्विटर हँडलवर बिबट्याच्या जोडीचे छायाचित्र शेअर केल्यानंतर ही बाब उघडकीस आली होती.