पोवारीटोल्यातील मजुराच्या मुलीची बॉक्सिंगमध्ये राज्यस्तरापर्यंत धडक

By admin | Published: September 25, 2016 02:25 AM2016-09-25T02:25:33+5:302016-09-25T02:25:33+5:30

विभागीय स्पर्धेत सुवर्णपदक आणि लागोपाठ राज्यस्तरिय स्पर्धेत कांस्यपदक कमविणारी काजल शहारे ही गोंदिया जिल्ह्याची पहिली बॉक्सर खेळाडू ठरली आहे.

Pokhirtoli's labor force hits the state level in boxing | पोवारीटोल्यातील मजुराच्या मुलीची बॉक्सिंगमध्ये राज्यस्तरापर्यंत धडक

पोवारीटोल्यातील मजुराच्या मुलीची बॉक्सिंगमध्ये राज्यस्तरापर्यंत धडक

Next

पटकावले कांस्यपदक : काजलने वाढविला जिल्ह्याचा गौरव
सालेकसा : विभागीय स्पर्धेत सुवर्णपदक आणि लागोपाठ राज्यस्तरिय स्पर्धेत कांस्यपदक कमविणारी काजल शहारे ही गोंदिया जिल्ह्याची पहिली बॉक्सर खेळाडू ठरली आहे. कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना एका गरीब मजुरवर्गीय कुटुंबातील काजलने पटकावलेले हे यश इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
काजलने संपूर्ण राज्यात टोकावरील गोंदिया जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे. तिच्या या कामगिरीमुळे जिल्हाभरात ती कौतुकाचा विषय ठरली आहे.
सालेकसा तालुक्यातील पोवारीटोला (कोटजमुरा) येथील मोलमजुरी करणारे रुपलाल शहारे यांची मुलगी काजल ही शहीद अवंती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोटजमुरा येथे बारावीची विद्यार्थिनी आहे. खेळात नेहमीच ती पुढे असते. परंतु घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि खेळाचे पोषक वातावरण ग्रामीण भागात नसल्याने अनेक वेळा तिला संधी गमवावी लागली. परंतु कराटे शिक्षक टी.ए. आलोत यांच्यासह प्रा.मंगेश ठाकरे, विजय मानकर यांनी तिचा उत्साह वाढविला. प्राचार्य माहुले यांनी तिला स्पर्धेत भाग घेण्याची संधी दिली. तालुकास्तरापासून जिल्हास्तरापर्यंत सहज मजल मारत तिने वर्धा येथे झालेल्या नागपूर विभाग स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
यानंतर तिला राज्यस्तरावर भाग घेण्याची संधी मिळाली. नंदुरबार येथे राज्यस्तरिय स्पर्धा असल्याने तिथे जाऊन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तिच्यापुढे अनेक अडचणी आल्या. एकीकडे आर्थिक अडचण तर दुसरीकडे ग्रामीण भागातील मुलगी असल्याने तिला पाठवावे की नाही, अशी काळजी. मात्र काजलची तीव्र उत्कंठा व शाळा संचालकांचे पाठबळ मिळाले आणि तिने आपल्या आईला सोबत घेऊन प्रा.मंगेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनात नंदूरबार गाठले.
सतत प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात बॉक्सिंग करणाऱ्या राज्यस्तरावरील खेळाडूंसमोर काजल टिकेल का, हा प्रश्न अनेकांच्या मनात उद्भवत होता. मात्र सर्व शंका-कुशंकावर मात करीत दिग्गज खेळाडूंशी झुंज देत काजलने कांस्यपदक पटकावले. बॉक्सिंगमध्ये गोंदिया जिल्ह्यातून कांस्यपदक पटकावणारी काजल पहिलीची मुलगी ठरली. यामुळे तिने शाळेचेच नाही तर सालेकसा तालुक्यासह गोंदिया जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. (तालुका (प्रतिनिधी)

-तर इतर मुलीही येतील पुढे
तिच्या या कामगिरीमुळे इतर मुलींनाही प्रेरणा मिळून पुढे ग्रामीण भागातून आणखी प्रतिभावान खेळाडू निर्माण होतील, अशी आशा तिच्या प्रशिक्षकांना आहे. शासनाने अशा खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी मदत करावी अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे.
गोंदिया जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष अमित बुद्धे व संस्थेचे सहसचिव दीपक सिक्का यांनी तिच्या या कामगिरीवर आनंद व्यक्त करीत तिचे अभिनंदन केले. तसेच अवंती ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भेरसिंह नागपुरे, सचिव महेन्द्रकुमार कुराहे यांनीही भरभरुन कौतुक केले.

Web Title: Pokhirtoli's labor force hits the state level in boxing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.