चिचबोडी कोंबड बाजारावर पोलिसांचा छापा, ५ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 06:05 PM2022-02-03T18:05:59+5:302022-02-03T18:14:45+5:30
चिचबोडी तलाव परिसरात सुरू असलेल्या कोंबडबाजारावर पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना अटक केली. त्यांच्याजवळून ८८ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गोंदिया : अर्जुनी मोरगाव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून बोंडगावदेवी गावालगत जंगल शिवारातील चिचबोडी तलाव परिसरात सुरू असलेल्या कोंबडबाजारावर पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना अटक केली. त्यांच्याजवळून ८८ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि.२) सायंकाळी करण्यात आली.
बोंडगावदेवी ते दिघोरी मार्गावरील जंगलशिवारातील चिचबोडी तलावात अवैधपणे कोंबड्याच्या झुंजीवर पैसे लावून हारजीतचा खेळ सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी जंगल शिवारात छापा टाकला. पोलीस आल्याचे पाहून काहींनी त्या ठिकाणाहून पळ काढला. घटनास्थळी ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या कारवाईत शंकर वामन माटे (३०), वाल्मीक जीवन कुंभारे (२९), जितेंद्र विजय चेटुले (३५), यशवंत दादाजी खंडाईत (४१) सर्व राहणार दिघोरी (मोठी), सचिन केवळराम नाकाडे (३०) बोंडगावदेवी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नगदी २ हजार ९१० रुपये जप्त करण्यात आले. दुचाकी क्रमांक होंडा सीडी एमएच ३६ एसी ९२६६, ग्लॅमर हिरो एमएच ३५ -४३२०, बजाज डिसकव्हर एमएच ३६ सी ९९२५ याप्रमाणे तीन दुचाकी असा एकूण ८८ हजार ७१० रुपयांचा ऐवज जप्त केला.
पोलीस हवालदार नरेश गोंडाणे, पोलीस नायब महेंद्र पुण्यप्रेडीवार, पोलीस शिपाई रामलाल राऊत यांनी कोंबड्याच्या झुंजीवर छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. पैशाची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळल्याने त्यांच्या विरोधात कलम १२ (अ) मजुका अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. पुण्यप्रेडीवार करीत आहेत.