पोलीस आपल्या दारी; गंभीर गुन्ह्यांची एफआयआर आता 'स्पॉट'वर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 08:26 PM2022-09-07T20:26:39+5:302022-09-07T20:28:01+5:30
गोंदिया पोलीसांचा उपक्रम: बलात्कार,पोस्को, गंभीर जखमी व जेष्ठ नागरिकांच्या तक्रारी घरीच घेणार
नरेश रहिले
गोंदिया : गुन्ह्यांना प्रतिबंध करणे व त्यानंतरचे महत्वाचे कर्तव्य म्हणजे घडलेल्या गुन्हयांचा तपास करून आरोपीविरुध्द योग्य व सबळ पुराव्यासह न्यायालयात दोषारोपपत्र सादर करणे हे पोलिसांचे काम आहे. एखाद्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात जावे लागत होते. परंतु आता गोंदियापोलिसांनी पोलीस आपल्या दारी हे उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार गंभीर गुन्ह्यांची एफआयआर पीडितेच्या घरी किंवा घटनास्थळावरच जाऊन पोलीस करणार आहेत, अशी माहिती पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी आयोजित पत्र परिषदेत दिली.
फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये पोलिसांना असलेल्या गुन्हयांच्या तपासाच्या अधिकाराबाबत जे अधिकारी देण्यात आलेत त्यापैकी सर्वात महत्वाची बाब म्हणजे गुन्हा घडल्यानंतर त्याचा सी.आर.पी.सी कलम १५४ प्रमाणे पोलीस स्टेशनला एफ.आय.आर. दाखल करण्यात येतो. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांच्या संकल्पनेतून गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिंकाच्या सुविधेसाठी पोलीस आपल्या दारी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याबरोबरच त्यांना लोकाभिमुख सेवा देणे, पोलिसांच्या कामकाजात गतिमानता आणणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. जेष्ठ नागरीक, शारीरिक कारणाने आजारी असणारे, बलात्कार पिडित, पोक्सोच्या गुन्हयातील पीडित, तक्रारदार आजारी किंवा जखमी असेल आणि ते रुग्णालयात उपचाराकरीता दाखल असतील अशा तक्रारदारांचे त्यांचा एफ.आय.आर. नोंदविण्यातील विलंब टाळण्यासाठी ठाणेदारांच्या आदेशान्वये पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना लॅपटॉप व प्रिंटर पुरविण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यात ही सुविधा सुरू झाली आहे. तक्रार लॅपटॉपवर टाईप करतील, प्रिंटरव्दारे त्याची प्रिंट काढून ती तक्रारदारास वाचण्यास देतील किंवा तक्रारदारास वाचून दाखवतील किंवा त्यांना त्यांच्या भाषेत समजावून सांगतील. ती तक्रार पोलीस ठाण्याला ई मेलव्दारे किंवा व्हॉटसअपव्दारे पाठवून त्याची पोलीस स्टेशनला एफ.आय.आर. (गुन्हा) नोंद करतील.
या उपक्रमाने हा होईल फायदा
पोलीस आपल्या दारी उपक्रमामुळे ज्या तक्रारदारांच्या मनात पोलिसाविषयी भिती असते, त्यांना पोलीस ढाण्यात जाण्यास संकोच वाटतो अशा तक्रारदारांचे एफ.आय.आर. नोंदविणे, पोलीस ठाण्यापासून दूर अंतरावर राहणारे दुर्गम भागातील तक्रारदारांचे एफ.आय.आर. नोंदविणे, १५ वर्षाखालील साक्षीदार किंवा ६५ वर्षावरील पुरुष साक्षीदार यांचे जबाब, बयाण नोंदविणे, महिला साक्षीदार किंवा मानसिकदृष्टया किंवा शारीरिकदृष्टया दिव्यांग साक्षीदारांचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन जबाब,बयाण नोंदविले जाणार आहे.
३७ लॅपटॉप पुरविले
सन २०२१-२०२२ या कालावधीत जिल्हा नियोजन समिती कडून गोंदिया जिल्हा पोलीस दलाकरीता प्राप्त निधीतून जिल्हा पोलीस दलाने ३७ लॅपटॉप्स व २१ प्रिंटर्स खरेदी केले आहे. ते जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्याला पुरविण्यात आले आहेत. हा उपक्रमाची प्रायोगिक तत्वावर २९ ऑगस्ट पासून गोंदिया शहर, आमगाव, अर्जूनी मोरगाव व रावणवाडी राबविण्यात आला आहे.
पोलिसांच्या कामात येईल गतीमानता
पोलीस आपल्या दारी या उपक्रमामुळे पोलिसांच्या कामकाजात गतिमानता येईल. जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याबरोबरच त्यांना लोकाभिमुख सेवा देता येईल. बलात्कार व पोक्सोच्या गुन्हयातील पीडिताची ओळख उघड होणार नाही. साक्षीदारांची घटनेबद्दल आठवण ताजी असल्याने घटनास्थळीच त्यांचे जबाब, बयाण नोंदविता येतील.
एफआयआर उशीरा दाखल झाल्यास गुन्हयाच्या तपास उशिराने सुरुवात होते. पुरावा नष्ट किंवा पुराव्यात फेरफार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे याचा फायदा सुनावणीवेळी आरोपीला होते. आरोपी निर्दोष सुटतो. एफ.आय.आर. नोंदणीमध्ये विलंब टाळण्याकरीता व तपासातील विसंगती दूर करण्याकरीता हा उपक्रम सुरू केला. यामुळे सर्वसामान्य नागरीकांचा पोलीसांवरील विश्वास दृढ होईल यात काही शंका नाही.
-विश्व पानसरे पोलीस अधीक्षक, गोंदिया.