देऊळगाव येथील आरोपींची पोलीस कोठडी आजपर्यंत
By admin | Published: May 29, 2017 01:46 AM2017-05-29T01:46:12+5:302017-05-29T01:46:12+5:30
अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या देऊळगाव-बोदरा येथील शेतजमीन खरेदी विक्री सौद्याच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या देऊळगाव-बोदरा येथील शेतजमीन खरेदी विक्री सौद्याच्या व्यवहारापासून झालेल्या भांडणातून शिवलाल नारायण भांडे (४३) यांचा खून करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयाने २९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या पोलीस कोठडीत पोलिसांना आरोपींनी काहीच माहिती दिली नसल्याने माहिती जाणून घेण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाकडे करणार आहेत.
बुधवारी (दि.२४) रोजी देऊळगाव-बोदरा येथील शिवलाल भांडे या शेतकऱ्यांने एक वर्षापूर्वी आपल्या मालकीच्या शेतजमिनीपैकी अर्धा एकर शेती अंतारामझोळे यांना सप्टेंबर २०१६ मध्ये विक्री केली. त्या जमिनीच्या मोबदल्यात मिळणारा पैसा त्यांनी एकाच वेळी दिला नाही. मृतक शिवलाल त्यांना वारंवार पैशाची मागणी करायचा. शेतजमीन विक्री करतेवेळी शिवलालची पत्नी मंदा भांडे (३०) यांनी संबधीताकडे आक्षेप नोंदवून जमिनीची विक्री रद्द करावी, अशी लेखी तक्रार केली होती. १७ मे २०१७ रोजी परत एक एकर शेतजमिनीची विक्री झोळे परिवाराने शिवलाल भांडे याचेकडून करवून घेतली. शेतजमिनीच्या विक्री सौद्यामधील एकही रुपया आम्ही पाहिला नाही असे मृतकाची पत्नी, आई व बहिणीचे म्हणणे आहे. प्रती एकर ४ लाख ८० हजार रुपयाप्रमाणे सौदा झाल्याचे सांगितले जाते. दुसऱ्यांदा विक्री झालेल्या शेतजमिनी प्रकारावर सुध्दा पत्नीने आक्षेप नोंदविला. परंतु तक्रारीची साधी चौकशी करण्याची तत्परता निष्ठूर अधिकाऱ्यांनी दाखविली नाही. या संदर्भात देऊळगाव/बोदरा येथील देवानंद दयाराम झोडे (३५), रितेश माधोराव झोडे (२२), दिनेश अंताराम झोडे (२९), अंताराम मोडकू झोडे (४९), प्रभू द्याराम झोडे (३४), हेमराज तुलसीराम बोरकर (४३), माधोराव मोडकू झोडे (४५), रेखा माधोराव झोडे (४०) या आठ जणांवर भादंविच्या कलम ३०२,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने या आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी त्या आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिसांनी आरोपींचे कपडे, नख, रक्त जप्त केले आहेत.