पोलीस वसाहतींचा प्रश्न निकाली काढणार
By Admin | Published: July 3, 2016 01:42 AM2016-07-03T01:42:30+5:302016-07-03T01:42:30+5:30
गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या पोलीस वसाहतींची परिस्थिती खराब आहे. त्यांच्यासाठी नवीन वसाहती निर्माण करणे गरजेचे आहे.
गृहराज्यमंत्री शिंदे : डुग्गीपारच्या इमारतीचे लोकार्पण
सडक-अर्जुनी : गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या पोलीस वसाहतींची परिस्थिती खराब आहे. त्यांच्यासाठी नवीन वसाहती निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारकडून निधी मिळवून देऊन हा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार, अशी ग्वाही राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली. डुग्गीपार पोलीस
ठाण्याच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते.
इंग्रजीच्या काळापासून असलेल्या डुग्गीपार पोलीस ठाण्याची इमारत जुनी झाल्यामुळे नवीन इमारतीची गरज लक्षात घेता नवीन इमारती बांधकाम करण्यात आले. त्याचे लोकार्पण शनिवारी झाले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे, आ. विजय रहांगडाले, आ.संजय पुराम, माजी आ.हेमंत पटले, नागपूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, सडक-अर्जुनी पं.स.च्या सभापती कविता रंगारी, कोहमाराचे सरपंच माया उईके, सडक-अर्जुनीच्या न.पं.अध्यक्ष सरीता लांजेवार, तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप झळके आदी पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, पोलीस मित्र उपस्थित होते.
यावेळी पोलीस मित्र व पोलीस पाटील यांची कार्यशाळाही घेण्यात आली. मंत्र्याच्या हस्ते जिल्ह्यातील पोलीस मित्र व पोलीस पाटलांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी गृहराज्यमंत्री शिंदे म्हणाले, नक्षलग्रस्त गोंदिया जिल्हा पूर्णपणे मोबाईल रेंजमध्ये जाणला जाईल. आदिवासी दुर्गम भागात मोबाईल रेंज राहत नसल्यामुळे माणूस माणसापासून दूर होत आहे. पोलिसाच्या शहीद कुटूंबाना भरभरून मदत केली जाईल. महिलांना पोलीस ठाणे हे त्यांचे माहेर वाटले पाहिजे, पोलीसाबद्दलची भिती दूर करा असे सांगून प्रत्येक ठाण्यात स्वागत कक्ष उभारण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्यामुळे बीएएमएस व बीएचएमएस डॉक्टरांवर काम भागवावे लागत असल्याचे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात ना.बडोले म्हणाले, गोंदिया जिल्ह्यात निसर्ग नटला आहे. मालगुजार तलाव आहेत, शेती चांगली आहे पण सुशिक्षीत बेरोजगारांना काम नाही, जिल्ह्यात अदानीशिवाय दुसरा मोठा प्रकल्प नाही, नवीन प्रकल्प उभारून रोजगाराची संधी उपलब्ध करू असे ते म्हणाले. प्रास्ताविक पो.अधीक्षक भुजबळ यांनी केले.