लाच स्वीकारताना पोलीस हवालदार चतुर्भुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:27 AM2021-01-18T04:27:10+5:302021-01-18T04:27:10+5:30
गोंदिया : हद्दपार करण्यात आल्याने त्यात मदत करण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी करून रक्कम स्वीकारणाऱ्या पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक ...
गोंदिया : हद्दपार करण्यात आल्याने त्यात मदत करण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी करून रक्कम स्वीकारणाऱ्या पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. पथकाने रविवारी (दि.१७) दुपारी ही कारवाई केली. रामसिंह बैस, असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदारावर दारूविक्री, शरीरावरील गुन्हे, कौटुंबिक भांडण व निवडणूक संबंधीचे गुन्हे दाखल आहेत. या तक्रारदारास ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत हवालदार बैस याने शनिवारी (दि.१६) फोन करून पोलीस अधीक्षकांनी तुझे जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश काढले आहेत, यामध्ये आम्ही मदत करू. मात्र, यासाठी १० हजार रुपयांचा एक लिफाफा पोलीस निरीक्षक व पाच हजार रुपयांचा लिफाफा माझ्यासाठी आण, असे सांगितले. यावर तक्रारदाराने रविवारी (दि.१७) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. तक्रारीच्या आधारे पथकाने दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चंदू मेश्राम यांच्या चहाच्या टपरीवर सापळा लावला. यामध्ये हवालदार बैस पंचांसमक्ष १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अडकला. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत कलम ७ लाप्रका १९८८ (सुधारित अधिनियम २०१८) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.