पोलिसांची दिवाळी ‘आॅन ड्युटी’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 12:25 AM2018-11-10T00:25:11+5:302018-11-10T00:26:02+5:30

सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी कुटुंबीयांसमवेत दिवाळीचा आनंद साजरा करीत असतानाच नागरीकांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी पोलिसांना मात्र दिवाळी 'आॅन ड्युटी'च साजरी करावी लागत आहे.

Police Diwali 'Aan Duty' | पोलिसांची दिवाळी ‘आॅन ड्युटी’च

पोलिसांची दिवाळी ‘आॅन ड्युटी’च

googlenewsNext
ठळक मुद्देकर्तव्य : ९० टक्के पोलीस बंदोबस्तावरच, समस्या सुटता सुटेना

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी कुटुंबीयांसमवेत दिवाळीचा आनंद साजरा करीत असतानाच नागरीकांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी पोलिसांना मात्र दिवाळी 'आॅन ड्युटी'च साजरी करावी लागत आहे.
दिवाळीसाठी इतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्या मिळत असल्याने सर्वांना आनंदोत्सव साजरा करता येतो. मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच रात्रीची गस्त घालून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करणारे पोलिस दिवाळीत २४ तास 'आॅन ड्युटी' पहायला मिळतात. जिल्हा पोलिस दलातील ९० टक्क्याहून अधिक कर्मचारी कामावर कार्यरत असून, ते विनातक्रार जबाबदारी पार पाडत आहेत. समाजातील सर्व घटकांतून दिवाळी हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कामासाठी शहरात गेलेले नागरिक दिवाळीसाठी गावाकडे येतात. दिवाळी आली की, आप्तजणांकडे जाण्याचा ओढा सर्वांना लागलेला असतो. घरामध्ये तयार केलेल्या गोडधोड पदार्थांपासून खमंग चिवड्याचा स्वाद घेत परिवारासमवेत दिवाळी साजरी केली जाते. या धामधुमीत पोलिसांना मात्र या सणाचा आनंद घेता येत नाही. दिवाळी सण असल्याने बसस्थानक, रेल्वे स्थानक, मंदिरे आदी ठिकाणी नागरिकांची गर्दी होणार हे ओळखून अशा ठिकाणी पोलिस बंदोबस्त असणे गरजेचे असते. गर्दीचा फायदा घेऊन घातपाती कारवाया किंवा चोरीसारखे गुन्हे घडण्याची शक्यता असल्याने पोलिसांना डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस बंदोबस्तासाठी थांबावे लागते. देशभरात कुठेही अनुचित घटना घडली की, हायअलर्ट लागू झाल्यानंतर पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात येतात. पोलिसांचे संख्याबळ जितके आवश्यक आहे त्यापेक्षा कमीच संख्याबळ असते. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवरच कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच गुन्ह्यांचा तपास करणे, रात्र गस्त, चौकी सांभाळणे आदी कामे पोलिसांना करावी लागतात.

सोमवारपासून सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु आहे. आबाल वृद्धांची बाजारात गर्दी दिसत आहे. या कालावधीदरम्यान जनतेचे रक्षण करण्यासाठी पोलिसांची रात्रीची गस्त सुरु असते. संबंधित पोलिस ठाणे, उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक गस्तीसाठी रात्रभर तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांंची दिवाळी सुखकारक होवो, यातच पोलिसांना दिवाळीचे समाधान वाटत असते.
महिला पोलिसांची अडचण
दिवाळीनिमित्त घरात फराळ बनविण्याचे मुख्य काम गृहिणी करतात. मात्र महिला पोलिसांना कामावरुन रजा मिळत नसल्याने वेळात वेळ काढून घरी जाऊन फराळ बनवावे लागते. शिवाय दिवाळीसाठी सून सासरी यावी, अशी सासरच्यांची इच्छा असते. मात्र कामावरुन सुटी मिळत नसल्याने सासरच्यांना समजावून सांगावे लागते. प्रसंगी नाराजी ओढावून घ्यावी लागते, अशी अडचण महिला पोलिसांची आहे. भाऊबिजेलाही हीच अडचण निर्माण होते. ही भावना समजुन घेणे गरजेचे आहे.
टाइमटेबल नाही
पोलिस खात्यात रुजू होण्याआधीच २४ तास 'आॅन ड्युटी' ही संकल्पना डोक्यात ठेवूनच पोलिस कामावर हजर होतात. त्यामुळे कुटुंबासाठी वेळ देणे शक्य होणार नाही, याची जाणिव असते. सध्या दिवाळीनिमित्त चोख बंदोबस्त असल्याने कधी घराला जायला मिळते किंवा नाही, याचा कोणताही टाइमटेबल नाही. आजारी किंवा अपरिहार्य कारणास्तव सुटी घेतलेले पोलिस वगळता बहुतांश पोलिस हजर आहेत.

Web Title: Police Diwali 'Aan Duty'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.