निवडणुकीवर पोलिसांची नजर
By admin | Published: January 5, 2017 12:48 AM2017-01-05T00:48:19+5:302017-01-05T00:48:19+5:30
गोंदिया शहरात शांततेच्या मार्गाने नगर परिषदेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडावी यासाठी सर्व हालचालींवर पोलिसांची करडी नजर आहे.
रात्रीची गस्त वाढविली : दोन प्रभागांमागे २८ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त
गोंदिया : गोंदिया शहरात शांततेच्या मार्गाने नगर परिषदेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडावी यासाठी सर्व हालचालींवर पोलिसांची करडी नजर आहे. पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांच्या सूचनेनुसार दोन प्रभागांचा एक गट तयार करून त्या प्रत्येक गटामागे एक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक व २५ कर्मचारी असा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
प्रचारादरम्यान कोणताही हिंसाचार होऊ नये, अनिष्ठ प्रथांना आळा बसावा, तसेच मतदान, मतमोजणीदरम्यान संभाव्य घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी सोमवारपासून गोंदिया शहरात चोख बंदोबस्त लावला आहे. शहरात एकूण २१ प्रभाग आहेत. दोन प्रभागांचा एक गट तयार करून त्या गटावर नजर ठेवण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली आहे. दोन पोलीस उपनिरीक्षक त्यांच्या मदतीला राहणार आहे. सोबतच २५ कर्मचारी, टाटा सुमो, जीप, लाईट व्हॅन, मोठे वाहन, वायरलेस सेटसह बंदोबस्त करतील.
या पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्मेट, ढाल, सिंगार्ड, रायफल पार्टी, गॅसगण यासह सुसज्ज ठेवण्यात येणार आहे. दोन प्रभागांचा एक गट असे एकूण ११ गट तयार करण्यात आले आहे. गट प्रमुख व त्यांच्या सोबत असलेले अधिकारी-कर्मचारी रॅली, कॉर्नर सभा, मतदारांची डोअर टू डोअर व्हिजीट व मोठ्या सभा यांचा बंदोबस्त प्रभाग अधिकारी व कर्मचारी करणार आहेत. हे अधिकारी-कर्मचारी एखाद्या गटात आणिबाणीची परिस्थीती निर्माण झाल्यास त्यांना प्रभावीपणे कसे सहकार्य करता येईल, यासाठी योजना तयार करतील.
या व्यतिरीक्त नक्षलग्रस्त भागातील सी-६० कमांडो वगळता सी-६० चे आठ पथके राखीव ठेवण्यात आलेली आहे. न.प.निवडणुकीसाठी विशेष बाब म्हणून एसआरपी कंपनीची मागणी केली आहे. ३०० पेक्षा अधिक होमगार्डची मागणी करण्यात आली आहे. पोलीस मुख्यालयात शिघ्र कृती दल सुसज्ज ठेवण्यात आले आहे. स्थानिक प्रभागांच्या बंदोबस्ताच्या मदतीसाठी हे दल पोहोचणार आहे. गोंदिया शहराच्या १४ प्रभागांसाठी १४३ मतदार केंद्र तर रामनगरच्या सात प्रभागासाठी ४७ मतदान केंद्र, तर तिरोड्याच्या तीन प्रभागासाठी १६ मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)
उपविभागीय अधिकाऱ्यांचे बस्तान ठाण्यात
गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ प्रभाग असून या प्रभागावर पर्यवेक्षण अधिकारी म्हणून गोंदिया येथील उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांना गोंदिया शहर ठाण्यात मतमोजणी होईपर्यंत ठाण मांडून प्रमुख म्हणून काम करावे लागणार आहे. रामनगर पोलीस ठाण्यातंर्गत सात प्रभाग असून या ठिकाणी देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्यावर पर्यवेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यादव चौक व भीमनगरात ‘राहुटी’
गोंदिया शहरात निवडणुकीच्या दृष्टीकोणातून अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या यादव चौक व भीमनगर चौक येथे पोलिसांनी ‘राहुटी’(चौकी) तयार केली आहे. त्यात वायरलेस, हालचाल रजिस्टर, डायरी अंमलदार, शस्त्र गार्ड नेमण्यात आले आहेत. या दोन्ही ठिकाणी आरसीपी प्लाटून वाहनासह तैनात करण्यात आले आहे.