बाईकस्वारांच्या स्टंटबाजीवर पोलिसांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:10 AM2021-08-02T04:10:50+5:302021-08-02T04:10:50+5:30
कपिल केकत गोंदिया : आजघडीला शाळेत जाणाऱ्या मुलांच्या हातातही आई-वडील गाडी देत आहेत. त्यातही तरुणांमध्ये सध्या रेसिंग बाईक्सची चांगलीच ...
कपिल केकत
गोंदिया : आजघडीला शाळेत जाणाऱ्या मुलांच्या हातातही आई-वडील गाडी देत आहेत. त्यातही तरुणांमध्ये सध्या रेसिंग बाईक्सची चांगलीच क्रेज असून त्या बाईकद्वारे ते स्टंटबाजी करतात. ही स्टंटबाजी समोरच्या व्यक्तीला इंप्रेस करण्याच्या नादात केली जाते. पण कित्येकदा ती त्यांच्याच अंगलट येते. शिवाय, कित्येकदा पुढील व्यक्तीही त्यांच्या तावडीत सापडते. शहरातही अशा स्टंटबाजी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र अशांवर वाहतूक नियंत्रण शाखेची नजर असून या ६ महिन्यांत १९ स्टंटबाजांवर कारवाई करण्यात आली आहे.
----------------------------------
स्टंटबाजांवरील कारवाई
२०१८ - ११
२०१९ - ३०
२०२० - ४०
२०२१ (जुलैपर्यंत) - १९
-------------------------------
२) दंड भरायचा अन् सुटका करून घ्यायची !
- वाहतूक नियंत्रण शाखेने या वर्षात जुलै महिन्यापर्यंत स्टंटबाजी करणाऱ्या १९ जणांवर कारवाई केली आहे. मात्र ही दंडात्मक कारवाई राहत असल्याने ते पैसे भरून पुन्हा मोकळे होतात.
- स्टंटबाजी करणाऱ्यांवर एक हजार रुपये दंड आकारला जातो. त्यात श्रीमंतांच्या मुलांसाठी ही रक्कम मोठी नसल्याने त्यांना रक्कम भरताना काहीच वाटत नाही व ते पुन्हा आपल्या बाईक्सने स्टंटबाजी करतातच.
- शहरातही सध्या अशा बाईकर्सची संख्या वाढताना दिसत आहे. यातूनच वाहतूक नियंत्रण शाखा कारवाया करीत आहे. मात्र पैसे भरल्यानंतर स्टंटबाजांना पुन्हा मोकळीक मिळते.
--------------------------
रेलटोली व रिंगरोड बनला अड्डा
- शहरातील रेलटोली गुरुद्वारा ते पाल चौक रस्त्यावर रात्रीला तरुणांची गर्दी राहत असून येथे तरुण सुसाट वेगात बाईक्स चालविताना दिसतात.
- शहरातील कुडवा रिंगरोड तसेच नवीन बायपास रस्ता सध्या तरुणांचा अड्डा बनला आहे. तरुण-तरुणी या रस्त्याने फिरताना दिसतात. यात आपले इम्प्रेशन मारण्यासाठी तरुण स्टंटबाजी करतात.
- आता शाळकरी मुलांच्याही हाती दुचाकी आल्या असून ते शाळा-महाविद्यालय परिसरात घिरट्या घालून इतरांना आकर्षित करण्यासाठी स्टंटबाजी करतात.
------------------------
...तर जिवावर बेतू शकते !
- स्टंटबाजी करताना कित्येकदा वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात घडले आहेत व त्यात कित्येकांचा जीवही गेला आहे.
- भरधाव वेगात वाहन चालवून घडलेल्या अपघातात प्रामुख्याने तरुणांचा जीव गेल्याच्या कित्येक प्रकरणांची नोंद पोलिसात आहे.
- या स्टंटबाजीच्या नादात कित्येक अपघात घडले असून यामुळे समोरील व्यक्तीच्या अंगलट आल्याचेही प्रकार घडले आहेत.
------------------------------
शहरातही सध्या भरधाव वेगात वाहन चालवून स्टंटबाजी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यातूनच आम्ही १९ कारवाया केल्या आहेत. शिवाय वाहतूक नियंत्रण शाखेचे अशा स्टंटबाजी करणाऱ्या व भरधाव वेगात वाहन चालविणाऱ्यांवर लक्ष आहे. वेळीच त्यांच्यावर कारवाईही केली जाईल.
- दिनेश तायडे
निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, गोंदिया
५) वाहतूक पोलीस प्रमुखाचा कोट