लालघाटी ते टाकेझरी जंगलात पोलीस- नक्षल चकमक; २५ मिनीटे चालली फायरिंग
By नरेश रहिले | Published: April 8, 2023 01:53 PM2023-04-08T13:53:44+5:302023-04-08T13:55:54+5:30
बेवारटोला डॅम जंगल परिसरात नक्षलवादी असल्याची माहिती
गोंदिया : महाराष्ट्र व छत्तीसगड सीमावर्ती गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत लालघाटी ते टाकेझरी जंगल भागात पोलीस पथक आणि नक्षलवादी यांच्यात ७ एप्रिल रोजी सायंकायी ६.३० वाजता चकमक झाली. ही चकमक तब्बल २० ते २५ मिनीटे सुरू होती. पोलिसांच्या दिशेने गोळीबार करणाऱ्या नक्षलवाद्यांवर सालेकसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारत सरकारद्वारे प्रतिबंधीत असलेली माओवादी- नक्षलवादी संघटनेकडून दरवर्षी जानेवारी ते जून यादरम्यान टि.सी.ओ.सी.कालावधी पाळला जातो. या कालावधीत प्रशासनाविरुद्ध बंड पुकारून देशविघातक कृती, घातपाताच्या घटना, विध्वसंक कृत्य करतात. नक्षलवादी जनमाणसात दहशत पसरवून आपला वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षल प्रभावित महाराष्ट्र- मध्य प्रदेश, छत्तीसगड सीमावर्ती भागात नक्षलवादी यांच्या दहशतवादी कारवायांवर आळा घालण्याकरीता जिल्हा पोलीस पथक अभियान राबवित आहेत.
७ एप्रिल रोजी गोंदिया महाराष्ट्र छत्तीसगड राज्याचे सिमा भागात सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत बेवारटोला डॅम जंगल परीसरात नक्षलवादी सशस्त्र दलम फिरत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाल्यामुळे पोलीस पथकाने नक्षल विरोधी अभियान राबविला. सी-६० चव्हाण पथकांचे पोलीस अधिकारी, अंमलदार, छत्तीसगड राज्याचे पोलीस अंमलदार व मध्यप्रदेशचे हक्स फोर्सचे अंमलदार असे पोलीस पथकांनी नक्षल विरोधी अभियान मुरकुटडोह क्रमांक २ ग्राम टाकेझरी जंगल परीसरात पेट्रोलिंग करीत असताना दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास सशस्त्र स्त्री व पुरुष नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर अंधाधुंद गोळीबार सुरु केला. पोलिसांनीही त्यांना चोख उत्तर दिले.
तब्बल २० ते २५ मिनीटे हा गोळीबार सुरू होता. पोलीस व वाढता दबाव पाहुन नक्षलवादी यांनी जोरजोरात लालसलाम जिंदाबाद, माओवादी जिंदाबाद अश्या घोषणा देत धनदाट जंगलाचा फायदा घेत छत्तीसगड राज्याच्या सिमेत पळून गेले. या प्रकरणात सालेकसा पोलीस ठाण्यात ८ एप्रिल रोजी पोलीस उपनिरीक्षक राजधर पठाडे यांच्या तक्रारी वरून अज्ञात नक्षलवाद्यांवर विविध कलमांसह, सहकलम ३/२७ भारतीय हत्यार कायदा १९५१ सहकलम १०, १६ ब, १८, २०, २३ बेकायदेशिर हालचाल प्रतिबंधक कायदा १९६७ अन्वये दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे करीत आहे.
हे साहित्य मिळाले
एक काळया रंगाची गणवेशावरील टोपी ज्यास पाठी मागील बाजुस स्टीलची क्लीप आहे. एक निळया रंगाचा रुमाल पांढया चौकटीचा, एक जोड काळया रंगाचा पराॅगान चप्पल असे साहीत्य मिळून आले.
८५ राऊंड फायर
पोलीस पथकाद्वारे नक्षलवाद्यांवर आत्मसंरक्षणनार्थ करण्यात आलेल्या गोळीबारात इंसास रायफलचे १३ राऊंड तर एके ४७ चे ७२ राऊंड असे एकूण ८५ राऊंड फायर करण्यात आले. या गोळीबारात नक्षलवादी जखमी झाल्याची दाट शक्यता आहे. नक्षलवाद्यांची शोध मोहीम सुरू आहे. पोलीस पथकातील सर्व अधिकारी व अंमलदार सुरक्षित आहेत.
नक्षलवादी काड्या घेऊन येतांना पोलिसांनी घेतली पोझीशन
विशेष अभियान सी -६० चव्हान पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार, छत्तीसगड राज्याचे पोलीस अंमलदार व मध्यप्रदेशचे हक्स फोर्सचे अंमलदार यांना समोरून दोन इसम साध्या गणवेशात खांदयावर कुऱ्हाड घेउन येत होते. त्याच्या मागे ठराविक अंतर ठेऊन ३ स्त्रीया व २ पुरुष गडद काळ्या हिरव्या रंगाचा गणवेश परीधान करुन हातात शस्त्रे घेऊन पोलीस पथकाचे दिशेने येताना दिसले. त्यावेळी पोलीस पथकाने पोझीशन घेतल्याने नक्षलवादी ओरडत मागेच पळाले.