पोलीस पाटील भरतीत घोळ
By admin | Published: November 21, 2015 02:18 AM2015-11-21T02:18:50+5:302015-11-21T02:18:50+5:30
पोलीस पाटील पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेत पहिल्या क्रमांवर असलेल्या उमेदवाराला वगळून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला नियुक्ती देण्यात आली.
हलबीटोलातील प्रकार : उपविभागीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
पांढरी : पोलीस पाटील पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेत पहिल्या क्रमांवर असलेल्या उमेदवाराला वगळून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला नियुक्ती देण्यात आली. परिसरातील ग्राम हलबीटोला येथे हा प्रकार घडला असून यातून पोलीस पाटील भरतीत घोळ झाल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे. यात सदर भरती प्रक्रियेला जबाबदार उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गोपाल राऊत व इतर काही लोकांनी केली आहे.
देवरी, आमगाव, सालेकसा व सडक-अर्जुनी तालु्क्यातील पोलीस पाटलांच्या रिक्त पदांसाठी खासगी एजंसीमार्फत परीक्षा घेण्यात आली. यात गोपाल इंदल राऊत (३३, रा. हलबीटोला) यांना लेखी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळाले. तसेच तोंडी परीक्षेत सर्व प्रश्नांचे अचूक उत्तर दिले. यामुळे यादीत त्यांचे नाव क्रमांक १ वर असतानाही क्रमांक तीनच्या उमेदवाराला नियुक्त करण्यात आले. त्यामुळे सदर पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये घोळ झाल्याची शंका आहे.
हलबीटोला (पांढरी) या गावामध्ये ९० टक्के जनता आदिवासी समाजाची आहे. तरीपण सदर गावाच्या पोलीस पाटील पदी सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवाराची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे गावांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या भरतीमध्ये अंतिम सूचीत नाव येण्यासाठी काही दलाल नेमून ‘जो देईल तो पोलीस पाटील होईल’ या म्हणीप्रमाणे आधार घेत पोलीस पाटलांची नियुक्ती करण्यात आल्याची उमेदवारांमध्ये चर्चा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जास्त शिक्षण असल्यापेक्षा कमी शिक्षण असलेल्याचा क्रमांक लागला. शिक्षणासोबत अन्य कार्यात व स्पर्धेत भाग घेतल्याचे व क्रमांक पटकावल्याचे प्रशस्तीपत्रक जोडलेल्या गुणांचा उल्लेख कुठेही नाही. तसेच परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमरे नसतानासुद्धा परीक्षा घेणे, अशा अनेक बाबीत चुका आढळून आल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करता पोलीस पाटील पदासाठी घेण्यात आलेली भरती रद्द करुन उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पालकमंत्री बडोले, आ.संजय पुराम यांच्यासह मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून करण्यात आली. (वार्ताहर)