पोलिसांनी उधळल्या चार दारू भट्ट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:30 AM2021-05-27T04:30:48+5:302021-05-27T04:30:48+5:30
तिरोडा : अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पोलीस कंबर कसून आहे व अवैध दारू विक्रेत्यांच्या वारंवार मुसक्या आवळत आहे. असे असतानाही ...
तिरोडा : अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पोलीस कंबर कसून आहे व अवैध दारू विक्रेत्यांच्या वारंवार मुसक्या आवळत आहे. असे असतानाही अवैध दारू विक्रेत्यांकडून दारू विक्री काही बंद केली जात नसल्याने पोलिसांचे धाडसत्र सुरूच आहे. अशातच पोलिसांनी ग्राम रामाटोला (सिल्ली) येथे एका घरावर धाड घातली असून तेथून चार लाख सहा हजार ४०० रूपयांचाी माल जप्त केला आहे.
ग्राम रामाटोला-सिल्ली येथे संजय सोविंदा बरेकर हा हातभट्टीने दारू गाळून विक्रीचा व्यवसाय करतो या माहितीवरून पोलिसांनी त्याच्या घरावर धाड घातली. यात त्यांना घरात ४ रनिंग भट्ट्या आढळल्या. तसेच त्याच्या घराच्या मागील बाजूस २३० प्लास्टिक पोतडीत प्रती पोतडी २० किलोप्रमाणे ४६०० किलो मोहा सडवा मोहवा ज्याची किंमत तीन लाख ६८ हजार रूपये आहे मिळून आला. तर डबकीत प्रत्येकी १० लीटरप्रमाणे २०० लीटर हातभट्टीची दारू, ४ लाकडी टवरे, ४ जर्मन घमेले, ४ लोखंडी ड्रम, ४ नेवार पट्टी, प्लास्टिक पाइप, ४ लोखंडी ड्रममध्ये ४० किलो गरम मोहा सडवा मोहवा, १२० किलो जळावू काड्या असा एकूण चार लाख सहा हजार ४०० रूपयांचा माल मिळून आला. तसेच आरोपी रनिंग भट्टी लावून मोहफुलांची दारू गाळताना मिळून आला.
सध्या कोविड-१९ ची साथ असल्याने आरोपीला अटक न करता कलम ४१(१)(अ) सीआरपीसी अन्वये नोटीस देण्यात आले आहे. पोलिस शिपाई विदेश अंबुले यांच्या तक्रारीवरून आरोपी संजय बरेकर याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नायक बांते करीत आहेत. ही कारवाई सपोनि ईश्वर हनवते, सपोनि अभिजीत जोगदंड, पोउपनि अशोक केंद्रे, पोलिस शिपाई विदेश अंबुले व पथकाने केली.