पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:30 AM2021-03-10T04:30:13+5:302021-03-10T04:30:13+5:30
चिचगड : आंभोरा येथील जंगलात सुरू असलेल्या जुगारावर धाड घालून पोलिसांनी चार जुगाऱ्यांना रंगेहात पकडले आहे. रविवारी (दि.७) करण्यात ...
चिचगड : आंभोरा येथील जंगलात सुरू असलेल्या जुगारावर धाड घालून पोलिसांनी चार जुगाऱ्यांना रंगेहात पकडले आहे. रविवारी (दि.७) करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी एक लाख ६० हजार ६१० रुपयांचा माल जप्त केला आहे.
अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस नायक मुळे, हलमारे, पवार, पोलीस उपनिरीक्षक मनोहर ईस्कापे, मासरकर, गंगापारी, शहारे व तांदळे यांनी आंभोरा जंगलात पाहणी केली असता, तेथे काही लोक ५२ पत्यांवर पैशांची बाजी लावून हार-जितचा खेळ खेळवीत असल्याचे दिसले. यावर पथकाने धाड टाकून दयालदास गरीबदास गोंडाणे (५८, भागी-सिरपूर), विनोद सुंदरलाल मडावी (३८, रा. पलानगाव), मनोज अंताराम राऊत (३२, रा. देवलगाव) व रामेश्वर नारायण ढोके (२९, रा. कढोली, नागपूर) यांना रंगेहात पकडले.
पथकाने त्यांच्याकडून रोख ३० हजार ५०० रुपये, आठ हजार ५०० रुपये किमतीचे ५ मोबाईल, एक लाख २० हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहन क्रमांक एमएच ०४-ईटी ९३४६, एक हजार रुपये किमतीचे ५२ ताशपत्ते असा एकूण एक लाख ६० हजार ६१० रुपयांचा माल जप्त केला. गुन्ह्यातील चारही आरोपींना अटक करण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध घेणे सुरु आहे. पुढील तपास ठाणेदार अतुल तवाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मनोहर इस्कापे करीत आहेत.