२५६० उमेदवारांची पोलीस भरतीला दांडी
By admin | Published: April 14, 2016 02:26 AM2016-04-14T02:26:46+5:302016-04-14T02:26:46+5:30
जिल्हा पोलीस विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या शिपाई पदाच्या ४० जागांसाठी २९ मार्च ते ९ एप्रिलदरम्यान शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात आली.
उन्हाचा तडाखा : ४० जागांसाठी ३५६८ उमेदवारांची शारीरिक चाचणी
गोंदिया : जिल्हा पोलीस विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या शिपाई पदाच्या ४० जागांसाठी २९ मार्च ते ९ एप्रिलदरम्यान शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात आली. जिल्ह्यात ६ हजार १२८ महिला-पुरूष उमेदवारांनी अर्ज केले होते. परंतु यंदाच्या भरतीला उन्हाचे चटके लागणार असे गृहीत धरून २ हजार ५६० उमेदवार या भरतीला हजर झालेच नाही.
भरती प्रक्रिया सुरू असताना गोंदिया जिल्ह्याचा पारा ४२ अंशावर चढला. परंतु दरवर्षी प्रमाणे यंदाही उन्हात शारीरिक चाचणी होऊ शकते असे गृहीत धरून गोंदिया पोलीस दलाच्या जोगसाठी अर्ज करणाऱ्या पुरूषांपैकी १ हजार ९३५ तर महिलांपैकी ६२५ महिला गैरहजर राहिल्या. यावर्षी सर्व आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. त्यात ४ हजार ४९३ पुरूषांचे अर्ज आले. त्यातील २ हजार २५८ पुरूषांनी शारिरिक चाचणी दिली. या शारिरिक चाचणीत व कागदपत्रात १ हजार ९५८ पुरूष पात्र झाले.तर ६०० जण अपात्र झाले. महिलांचे १ हजार ६३५ अर्ज आले होते. त्यातील १०१० महिला शारीरिक चाचणीसाठी हजर झाल्या. यातील २७५ महिला पात्र तर ७३५ महिला अपात्र झाल्या. महिला, पुरूष असे मिळून ३ हजार ५६८ जणांनी शारिरिक चाचणी दिली.
गोंदिया जिल्ह्यातील उमेदवारांना यावर्षी चटके लागणार नाही अशी व्यवस्था गोंदिया पोलिस विभागाने केली होती. त्यामुळे उन्हाचे चटके यावर्षी तरूणांना लागले नाही. (तालुका प्रतिनिधी)
लेखी परीक्षा १९ किंवा २० रोजी
शारिरिक चाचणी उतीर्ण झालेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाणार नाही. एका पदामागे १५ उमेदवार घेण्यात येणार आहे. त्यामुळे ४० पदासाठी ६०० उमेदवारांना बोलावले जाणार असल्याचे अपेक्षित असले तरी एकाच सारखे गुण शेकडो मुलांनी घेतल्यामुळे टक्केवारीनुसार समान आकडा असलेल्या सर्व मुलांना लेखी परीक्षेसाठी त्या सर्वाना बोलावण्यात येणार आहे. त्यामुळे ८०० ते ९०० उमेदवारांना बोलावल्या जाण्याची शक्यता आहे. १९ किंवा २० एप्रिल रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली.