पोलीस स्टेशन आपल्या गावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 12:49 AM2018-03-07T00:49:34+5:302018-03-07T00:49:34+5:30
डुग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सडक-अर्जुनी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये पोलीस स्टेशन आपल्या गावी या संकल्पनेतून फिरते पोलीस स्टेशन राबविण्यात येत आहे.
ऑनलाईन लोकमत
सडक-अर्जुनी : डुग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सडक-अर्जुनी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये पोलीस स्टेशन आपल्या गावी या संकल्पनेतून फिरते पोलीस स्टेशन राबविण्यात येत आहे. या अभिनव उपक्रमाची तालुक्यात सध्या चांगलीच चर्चा आहे.
डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी दररोज एका गावामध्ये जावून गावकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे. या उपक्रमा दरम्यान गावात जाऊन गावकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्या तक्रारींचे निराकरण केले जात आहे.
गावात दवंडी देवून कायद्याची माहिती देणे, युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करणे, गावात दारुबंदी व अवैध व्यवसाय बंद करणे, ग्राम सुरक्षा दल स्थापन करणे, गावात शांतता व सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी गावकऱ्यांना कायद्याची माहिती देणे, स्वच्छता अभियानावर चर्चा करणे, गावातल्या तक्रारी गावातच तंटामुक्त समितीच्या माध्यमातून सोडविणे आदी उपक्रम राबविले जात आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील कोहळीटोला (आदर्श) या गावी फिरते पोलीस स्टेशन कार्यक्रम पार पडला.
या वेळी ठाणेदार किशोर पर्वते, पीएसआय झरेकर, हवालदार चटूले, सरपंच जिवन लंजे, पोलीस पाटील अनिता लंजे, दारुबंदी अध्यक्ष रेखा रहिले, ईश्वर लंजे, वामन लंजे उपस्थित होते.