पोलीस व्यवस्था जनतेच्या सोयीसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2017 12:55 AM2017-01-06T00:55:01+5:302017-01-06T00:55:01+5:30
पोलीस व्यवस्था ही सर्वसामान्य जनतेच्या सोयीसाठी व रक्षणासाठी आहे. सामाजिक संतुलन राखण्याचे
मोहन खांदारे : ‘रेझिंग डे’ निमित्त उद्बोधन कार्यक्रम
सालेकसा : पोलीस व्यवस्था ही सर्वसामान्य जनतेच्या सोयीसाठी व रक्षणासाठी आहे. सामाजिक संतुलन राखण्याचे प्रयत्न करीत असामाजिक व गैरकायदेशीर कृत्यांवर आळा घालण्यास पोलीस महत्वाची भूमिका पार पाडते. अशात पोलीस विभागाला जनसहकार्य मिळणेसुध्दा तेवढेच महत्वाचे आहे, असे प्रतिपादन सालेकसाचे पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांनी केले.
ते शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालयात पोलीस दल स्थापना दिन आणि सावित्रीबाई फुले जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करीत होते.
प्रताप मेमोरियल चेरिटेबल ट्रस्ट गोंदिया द्वारे संचालित शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय सालेकसा आणि पोलीस विभाग सालेकसा यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस दल स्थापना दिवस (रेझींग डे) व भारताची आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती हे दोन्ही कार्यक्रम संयुक्तरित्या घेण्यात आले.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अपर्णा खुरसेल होत्या. उद्घाटन ठाणेदार मोहन खांदारे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस विभागातील बिट जमादार उकरे, नेवारे, सुनिता दसरिया, भावगिरी कटरे व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सुरूवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला अभिवादन करीत आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी ठाणेदार खांदारे यांनी महिलांसाठी बनलेल्या कायद्यांवर मार्गदर्शन केले. समाजात महिलांच्या स्थितीबद्दलसुध्दा मार्गदर्शन केले. अपर्णा खुरसेले यांनी महिलांनी स्वत:ची योग्यता ओळखून त्याचा उपयोग करीत आत्मसन्मानाने जगण्याचे आवाहन केले. यावेळी इतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनीसुध्दा समयोचित मार्गदर्शन केले. कायद्याचा कसा सन्मान केला पाहिजे, याबद्दल माहिती दिली.संचालन प्रवीण पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन गिरीष देशमुख यांनी केले. कार्यक्रमासाठी प्राध्यापक, विद्यार्थी तसेच पोलीस कर्मचारी आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
महाविद्यालयात आयोजित पोलीस दल स्थापना दिवस व सावित्री फुले जयंती कार्यक्रमात बोलताना पोलिस निरीक्षक खांदारे.