बिरसी विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रफुल्ल पटेल यांच्यात राजकीय चर्चा
By अंकुश गुंडावार | Published: November 5, 2023 02:00 PM2023-11-05T14:00:44+5:302023-11-05T14:03:31+5:30
विमानतळावर केले स्वागत: लोकप्रतिनिधींची उपस्थिती
गोंदिया : लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात विधानसभा निवडणुका होत असून त्याच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी (दि.५) मध्यप्रदेशातील शिवणी येथे प्रचार सभेसाठी जाण्याकरिता आले होते. तेथे जाण्यासाठी गोंदिया येथील बिरसी विमानतळावर सकाळी १० वाजता पंतप्रधान मोदी यांचे आगमन झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गटाचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पंधरा ते वीस मिनिटे राजकीय चर्चा झाल्याची माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बिरसी विमानतळावर आगमन झाल्यानंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी खा. सुनील मेंढे, आ विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, माजी आ. राजेंद्र जैन, गोपालदास अग्रवाल यांनी पुष्पगुच्छ देवून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदी आणि पटेल यांच्यात चर्चा झाली. जवळपास २० मिनिटे झालेल्या चर्चेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील विकास कामे, बिरसी विमानतळावरुन १ डिसेंबरपासून प्रवासी विमान वाहतूक सेवा प्रारंभ होत आहे. तसेच भविष्यात या विमानतळावरुन कार्गो सेवा सुरु झाल्यास तांदूळ व अन्य कृषी मालाची निर्णयात करण्यास मदत होईल. शिवाय रोजगाराच्या संधी निर्माण होवून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल आदी विषयावर चर्चा झाली. राज्यात शिंदे गट आणि अजित पवार गटांच्या आमदार अपात्रतेबाबत सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि पटेल यांच्यात काही चर्चा झाल्याचे बोलल्या जाते.
विमानतळ परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त
मागील चार दिवसांपासून हा परिसर ताब्यात घेण्यात आला होता. तीन दिवसांपासून पोलिसांच्या विविध पथकांची मॉकड्रिल सुरू होती. पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्याविषयी मोठी गोपनीयता बाळगण्यात आली होती. पंतप्रधान मोदी प्रचार सभेनंतर परत येऊन विशेष विमानाने दिल्लीकडे प्रयाण करतील. पंतप्रधानांच्या या दौऱ्यानिमित्ताने बिरसी विमानतळ परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. याकरिता गोंदिया जिल्ह्यासह शेजारील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांतून पोलीस बळ, श्वान पथक, बॉम्ब शोध पथक, अशी विविध पथकांसह अतिरिक्त कुमक मागवण्यात आली.