निवडणुकांमुळे जिल्ह्यात दिवाळीनंतर राजकीय धुराळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2021 05:00 AM2021-11-07T05:00:00+5:302021-11-07T05:00:02+5:30
यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांना विशेष महत्त्व असून पुढील वर्षी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना सर्व प्रमुख पक्षांचा जोर स्थानिक स्वराज्य संस्थेत अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यावर राहणार आहे. यामुळेच सध्या जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे दौरे वाढले आहे. दिवाळी मिलन, सभा, बैठका आणि कार्यकर्ते मेळावे घेऊन निवडणुकीपूर्वीची वातावरण निर्मिती केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ मागील वर्षी १५ जुलैला संपला. तेव्हापासून जि.प. वर प्रशासक नियुक्त आहे. तर आता गोंदिया, तिरोडा नगर परिषदेसह चार नगर पंचायतींचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यातच चार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. या सर्व निवडणुकांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून दिवाळीनंतर जिल्ह्यात राजकीय धुराळा उडण्याची शक्यता आहे.
यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांना विशेष महत्त्व असून पुढील वर्षी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना सर्व प्रमुख पक्षांचा जोर स्थानिक स्वराज्य संस्थेत अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यावर राहणार आहे.
यामुळेच सध्या जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे दौरे वाढले आहे. दिवाळी मिलन, सभा, बैठका आणि कार्यकर्ते मेळावे घेऊन निवडणुकीपूर्वीची वातावरण निर्मिती केली जात आहे. सर्वात आधी पुढील महिन्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक राजकारणावर आणि सहकार क्षेत्रावर पकड मजबूत करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते. त्या पाठोपाठ पुढील महिन्यातच नगर परिषद आणि नगर पंचायतींचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने जानेवारी महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे.
तर कोरोनाचा संसर्ग आता आटोक्यात आला असल्याने व परिस्थिती पूर्वपदावर आल्याने जिल्हा परिषदेच्या लांबलेल्या निवडणुकासुद्धा जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पुढील दोन महिने जिल्हावासीयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणार आहेत.
युती, आघाडीवर चर्चानंतर, सध्या जनसंपर्कावर भर
- राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. तर हेच चित्र स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये कायम राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. तसेच या निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपनेसुद्धा आंदोलने, मेळावे घेऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यास सुरुवात केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुका लक्षात घेता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच सभा बैठकांमध्ये त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहे.
- दिलीप बन्सोड, जिल्हाध्यक्ष काँग्रेस
मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेत सर्वाधिक २० जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला होता. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाचे पक्षाचे पदाधिकारी व सदस्य जोमाने कामाला लागले आहे.
- विजय शिवणकर,
जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
मागील वर्षभरापासून शिवसेनेने जिल्ह्यात कार्यकर्ते मेळावे आणि विविध कार्यक्रमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या जाणून त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- मुकेश शिवहरे, जिल्हा सहसंपर्क प्रमुख
राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. या सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर उघडण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून आंदोलने केली जात आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरकारला याचा निश्चितच फटका बसेल.
- केशव मानकर, जिल्हाध्यक्ष भाजप