राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:30 AM2018-04-30T00:30:56+5:302018-04-30T00:30:56+5:30
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेवून निवडणुकीसंदर्भात माहिती देताना ते बोलत होते.
या वेळी प्रामुख्याने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भूजबळ उपस्थित होते.
काळे पुढे म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली असून आचारसंहितेची माहितीसुध्दा निवडणूक आयोगाने दिली आहे.
सदर अधिसूचनेद्वारे ३ मे रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिध्द करणे, १० मे अर्ज भरण्याची मुदत, ११ मे उमेदवारी अर्जांची छाणनी करणे, १४ मे अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत, २८ मे रोजी मतदान व ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. ही लोकसभा पोटनिवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे सहकार्य अपेक्षीत आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
सदर बैठकीला उपजिल्हाधिकारी (सामान्य) शुभांगी आंधळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, नायब तहसीलदार (निवडणूक) राजश्री मलेवार, तसेच जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन समाज पार्टीचे प्रतिनिधी उपस्थित होते.