राज्यशास्त्र हा ज्ञानाचा व रोजगाराचा विषय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:20 AM2021-06-17T04:20:39+5:302021-06-17T04:20:39+5:30
गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्ष पटेल, सचिव राजेंद्र जैन व संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात येथील नटवरलाल माणिकलाल दलाल ...
गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्ष पटेल, सचिव राजेंद्र जैन व संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या आयक्यूएसी अंतर्गत पदव्यूत्तर राज्यशास्त्र विभाग, स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन विभाग व द युनीक अकादमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डाॅ. शारदा महाजन यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणात राज्यशास्त्राची भूमिका व स्पर्धा परीक्षा या विषयावर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेत मुंबई विद्यापीठाच्या शिवळे महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन केन्द्राचे समन्वयक डाॅ. संजय वाघ बोलत होते. दोन दिवसीय ऑनलाईन राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटनीय भाषण नमाद महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. शारदा महाजन यांनी केले.
डाॅ. वाघ पुढे म्हणाले, राज्यशास्त्राच्या अभ्यासातून रोजगाराची अनेक दालने खुली होतात. या विषयाच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण घडते. देशातील राजकारणाचे सध्या गुन्हेगारीकरण होत आहे. गर्भश्रीमंत पैशाच्या बळावर आमदार, खासदार होतात. बुद्धिमान व चारित्र्यवान व्यक्तींना पराभवाचा सामना करावा लागतो. गुन्हेगार निवडून येणाऱ्यांची संख्या धोकादायक असून यामुळे गुंडाराज येण्याची शक्यता आहे. याला आळा घालण्यासाठी मतदारांमध्ये जागृती आवश्यक असून ते निर्माण करण्याचे काम राज्यशास्त्र या विषयाच्या अभ्यासातून होते. लोकशाही व्यवस्थेत जनतेची विकासाची कामे करण्यासाठी प्रशासन व्यवस्था तयार केली जाते. या व्यवस्थेद्वारे विकासाची प्रक्रिया निरंतर सुरु असते. लोकशाहीत नागरिकांना विविध प्रकारचे हक्क मिळतात. या हक्कांच्या माध्यमातून नागरिकांना विकासाची हमी मिळते. त्यामुळे देशातील नागरिक लोकशाही आणि राजकारणाप्रति जागरुक होणे आवश्यक आहे, असेही डाॅ. वाघ यांनी सांगितले. दोन दिवस चाललेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेचे संचालन प्रा. घनशाम गेडेकर यांनी केले. प्रास्ताविक द युनीक अकादमीचे समन्वयक चंद्रकांत खराटे यांनी केले. आभार डाॅ. शशीकांत चोरे व डाॅ. एच. पी. पारधी यांनी मानले. राज्यस्तरीय कार्यशाळेसाठी राज्याच्या विविध भागातून ५०० पेक्षा अधिक विध्यार्थी सहभागी झाले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी स्पर्धा परिक्षा व व्यवसाय मार्गदर्शन विभागाचे समन्वयक डाॅ. अंबादास बाकरे व राज्यशास्त्र विभागाचे डाॅ. एच. पी. पारधी, डाॅ. किशोर वासनिक, डाॅ. शशीकांत चोरे यांनी सहकार्य केले.
..........
स्पर्धा परीक्षा म्हणजे व्यक्तीमत्वाची चाचणी
पदवी काळात राज्य लोकसेवा आयोग आणि केन्द्रीय लोकसेवा आयोग या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, या विषयावर द युनिक अकादमी पुणे चे प्रा. जव्वाद काझी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा. काझी म्हणाले, स्पर्धा परीक्षा म्हणजे उमेदवाराच्या व्यक्तीमत्वाची चाचणी होय. विशिष्ट व्यक्तीमत्वाचा शोध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून घेतला जातो. स्पर्धा परीक्षेच्या मुख्य परिक्षेत निबंध लिखाणातून उमेदवारांचे अंतरंग तपासले जातात. मुलाखतीच्या माध्यमातून सुद्धा उमेदवारांचे व्यक्तीमत्व तपासले जाते. सनदी अधिकाऱ्यांना पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या पुढे ठेऊन तसा व्यक्तीमत्व घडविण्याचा प्रयत्न करावा, असा मोलाचा सल्ला प्रा. काझी यांनी दिला.