३४१ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 10:16 PM2017-10-15T22:16:30+5:302017-10-15T22:16:40+5:30
मागील पंधरा ते वीस दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीने ग्रामीण भागातील राजकाण तापले होते. त्यानंतर सोमवारी (दि.१६) जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील पंधरा ते वीस दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीने ग्रामीण भागातील राजकाण तापले होते. त्यानंतर सोमवारी (दि.१६) जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे.नक्षलप्रभावीत भागात सकाळी ७ ते दुपारी ३ या कालावधीत तर इतर भागात सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत मतदान होणार आहे.
जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला होता. मात्र यापैकी तीन ग्रामपंचायतची निवडणूक काही नागरिकांनी आक्षेप घेतल्याने निवडणूक विभागाने ती रद्द केली. तर चार ग्रामपंचायतची निवडणूक अविरोध पार पडली. त्यामुळे सोमवारी (दि.१६) ३४१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. ३४७ सरपंचपदांसाठी एकूण १ हजार ५१ उमेदवार तर ३ हजार २३ सदस्य पदांसाठी ५ हजार ८१८ उमेदवार रिंगणात होते. यापैकी ८ सरपंच व ३१३ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे उर्वरित पदासाठी सोमवारी निवडणूक होणार आहे.
यंदाच्या निवडणुकीपासून सरपंचाची निवड थेट जनतेतून केली जाणार असल्याने या पदासाठी चांगलीच चूरस पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी आहे. याच निवडणुकीवर पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीचे भविष्य अवंलबून असते. त्यामुळे ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. मागील दहा दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी ग्रामीण भागात तळ ठोकून आहेत. शनिवारी निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांनी रॅली काढून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिल्याचे चित्र होते.
दरम्यान सरपंच आणि सदस्यपदांसाठी सोमवारी मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक विभागातर्फे मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यात आल्या आहे. पोलीस प्रशासनाने संवेदनशिल आणि नक्षलप्रभावीत भागातील मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावला आहे.
भेटीगाठी आणि आश्वासने
३४१ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी निवडणूक होणार आहे. त्यासाठी रविवारी (दि.१५) सर्वच उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर आणि त्यांचे मन वळविण्यावर भर दिला. मतदारांना खूश करण्यासाठी सर्वच क्लृप्त्यांचा वापर उमेदवारांकडून केला जात होता. सोमवारी मतदान होणार असल्याने मते मिळावी, यासाठी उमेदवारांचे अखेरपर्यंत प्रयत्न सुरू होते. त्यामुळे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांसाठी रविवारची रात्र कत्तल की रात होती.एकूणच ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.
संवेदनशील मतदान केंद्रांवर नजर
निवडणूक विभागाने जिल्ह्यातील ८० वर मतदान केंद्र संवेदनशिल जाहीर केले आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान कुठलाही गोंधळ उडू नये, यासाठी निवडणूक आणि पोलिस प्रशासनातर्फे या केंद्रावर करडी नजर ठेवली जात आहे. यासाठी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात येणार आहे.