तलावांच्या जलोद्यानाचे काम जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 06:00 AM2019-12-03T06:00:00+5:302019-12-03T06:00:09+5:30
गोंदिया व भंडारा हे तलावांचे जिल्हे आहेत. एकट्या गोंदिया जिल्ह्यात काही दशकापूर्वी ३० हजारांच्या जवळपास जलाशये होती. पण आता काहीच जलाशये शिल्लक राहिली आहेत. ज्या जलाशयांची जैवविविधता चांगली त्यावर पक्षी येतात. गोंदिया जिल्हा कधीकाळी स्थलांतरीत पक्षी आणि सारस पक्ष्यांसाठी प्रसिद्ध होता. परंतु जलाशयांची गुणवत्ता घसरली व पक्ष्यांची संख्या ही कमी झाली.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जलाशयांचे पर्यावरण व विविधतेतील इतर घटक निर्भर असतात. पण जलाशयांचे पर्यावरणच दुषीत असेल तर हे घटक पाठ फिरवितात. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात हीच स्थिती आहे. सारस आणि स्थलांतीत पक्ष्यांचे माहेरघर असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील जलाशयांचे पर्यावरण टिकविण्यासाठी स्वयंसेवीनी सन २०१२ पासून धडपड सुरू केली. त्यातून परसवाडा, लोहारा व आमगाव येथील नवतलाव अशी तीन उत्कृष्ट जलोद्याने तयार झालीत. तर बाजारटोला, झालीया, झिलमीली यांच्यावर काम सुरू आहेत. हा राज्यातील पहिला प्रयोग ठरला आहे.
गोंदिया व भंडारा हे तलावांचे जिल्हे आहेत. एकट्या गोंदिया जिल्ह्यात काही दशकापूर्वी ३० हजारांच्या जवळपास जलाशये होती. पण आता काहीच जलाशये शिल्लक राहिली आहेत. ज्या जलाशयांची जैवविविधता चांगली त्यावर पक्षी येतात. गोंदिया जिल्हा कधीकाळी स्थलांतरीत पक्षी आणि सारस पक्ष्यांसाठी प्रसिद्ध होता. परंतु जलाशयांची गुणवत्ता घसरली व पक्ष्यांची संख्या ही कमी झाली. सारस संवर्धनासाठी काम करणाऱ्या सेवा संस्थेच्या चमूने पक्ष्यांचा अधिवास असणारी जलाशये निवडली. परसवाडा, लोहारा आणि आमगाव येथील नवतलाव या तीन तलावांकरिता सामाजिक वनिकरण, जैवविविधता विभाग व वनविभागाची मदत घेवून या जलाशयाची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला.
जलाशयांची स्थिती, त्यांची जैवविविधता, त्यावर येणारे पक्षी आणि पर्यावरण याचा अभ्यास करुन जलाशय टिकविण्याच्या मूळ कारणांचा शोध घेण्यात आला. या तीन गावांनंतर जिल्ह्यातील ३० तलावांसाठी सेवा संस्थेच्या माध्यमातून समाज आधारीत संवर्धनावर अभ्यासपूर्ण व्यवस्थापन आणि कृती आराखडा तयार केला. यात अशाच गावातील जलाशये निवडण्यात आली. ज्यांना तिथल्या वनस्पती व पक्ष्यांचे ज्ञान आहे.
तलाव वाचेल तर पक्षी वाचतील हे ज्यांना समजते त्यांना सोबत घेवून जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भात प्रस्ताव ही पाठविला. सारसांच्या भवितव्याचा आणि गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक व स्थलांतरीत पक्षी वैभव जागतिक पातळीवर नेवून ठेवण्यासाठी प्रशासनाच्यावतीने लवकरच सकारात्मक पावले उचलली जातील. नवेगावबांधच्या नवेगाव तलावाचे देखील पुर्नरजीवन केले जाणार आहे. सेवा संस्थेचे सावन बहेकार, चेतन जसानी, मुनेश गौतम, अविजीत परिहार, अंकित ठाकुर, शशांक लाडेकर, कन्हैया उदापुरे, दुष्यंत आकरे हे जुन्या तलावांना पुनर्जीवन देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
यामुळे नष्ट होतात जैवविविधता
गेल्या काही वर्षात जलाशयांमध्ये बेशरम (ईकोर्निया) यासारख्या वनस्पतींचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे जलाशयाची जैवविविधता नष्ट होत आहे. मासेमारी संघटनांना जलाशयावर मासेमारी करण्यासाठी लिज दिली जाते. या जलशयांमध्ये कोणत्या प्रजातीच्या मासांचे आणि किती प्रमाणात त्यांचे बीज टाकले जावे यासंदर्भात नियम आहेत. परंतु नियमांचे पालन होत नाही आणि प्रशासनही याकडे दुर्लक्ष करते. प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे याचाच फायदा घेत मासेमारी संघटना अधिक उत्पादन घेण्याच्या नादात झटपट वाढणाºया मास्यांचे बीज टाकतात. त्याचा दुष्परिणाम जलाशयांच्या जैवविविधतेवर होतो.
मग्रारोहयोची कामे तलावांवर टाळा
ज्या जलाशयांवर पक्ष्यांचा अधिवास आहे त्या तलावांवर रोहयोची कामे करू नयेत. जलाशयाच्या आजुबाजूला असणाºया शेतांमध्ये रासायनिक खते आणि औषधांची फवारणी केली जाते. या शेतांमधील पाणी जलाशयात येत असल्यामुळे जलाशयातील पाण्याची गुणवत्ता खराब होते. मग्रारोहयो अंतर्गत व इतर योजनांच्या माध्यमातून करण्यात येणाºया जलाशयांचे खोलीकरण यामुळे जैवविविधतेला धोका पोहोचतो. तलावातील वनस्पती नष्ट होतात. परिणामी पक्ष्यांचे अधिवास असलेल्या तलावांवर खोलीकरणाची कामे करण्यात येऊ नयेत.
जिल्ह्यातील ९० टक्के जलाशये संपली
शासकीय, मालगुजारी, मध्यम प्रकल्प, खासगी असे जलाशयांचे अनेक प्रकार आहेत. गोंदिया जिल्ह्यात हजारो जलाशये होती. परंतु अलिकडे आलेल्या अहवालानुसार गोंदिया जिल्ह्यातील ९० टक्के जलाशये संपली आहेत. हे जलाशय सिंचन व त्यातील मासेमारी मालकापुरतीच होते. मात्र कुटुंब विस्तारत गेले आणि जलाशयाची जागा शेतीने घेतली. माजी मालगुजारी जलाशय परिसरातील शेती अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले. खासगी तलाव संपण्याच्या मार्गावर असले तरीही इतर तलाव कसे वाचविता येतील यासाठी प्रशासनाने ही गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
तालवांचे रिस्टोरेशन आणि व्यवस्थापन आराखडा, त्यानंतर कृती आराखडा आणि अमंलबजावणी करून तीन तलावांचे पुनरूज्जीवन करण्यात आले. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन कामे केली जातात. गावात जनजागृती म्हणून भिंतीवर चित्र काढून जनजागृती करण्यात येते. जिल्ह्यातील तीन जलाशये पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ‘मॉडेल’ आहेत.
सावन बहेकार
वन्यजीवतज्ज्ञ तथा अध्यक्ष सेवा संस्था, गोंदिया.