ओवारा कालव्याची दयनीय अवस्था
By admin | Published: May 31, 2017 01:18 AM2017-05-31T01:18:50+5:302017-05-31T01:18:50+5:30
ओवारा प्रकल्प तयार होऊन जवळपास १५ वर्षांचा काळ लोटला. मात्र या प्रकल्पाच्या पाण्यापासून शेतकरी वंचित आहेत.
शेतकऱ्यांना शिक्षा : प्रकल्प असूनही सिंचनापासून दूर
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : ओवारा प्रकल्प तयार होऊन जवळपास १५ वर्षांचा काळ लोटला. मात्र या प्रकल्पाच्या पाण्यापासून शेतकरी वंचित आहेत. प्रकल्पाचे काम सुरू असताना कालवे तयार करण्यात आले; मात्र अनेकदा कालवे पावसाळ्यात फुटल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळत नाही. ओवारा कालव्याची एवढी खस्ता हालत असताना शिक्षा शेतकऱ्यांना भोगावी लागत आहे.
यावर्षी रबीकरिता कारूटोला, सलंगटोला, हेटी, सातगाव, रुंगाटोला, साखरीटोला येथील शेतीला पाणी देण्यात आले. मात्र धरणात जे पाणी रबी निघाल्यानंतर शिल्लक आहे, ते पाणी कालव्यास पिण्याकरिता सोडण्यात यावे, अशी यावर्षी जि.प. सदस्य जियालाल पंधरे यांनी लेखी निवेदन देऊन मागणी केली. मात्र जलाशयात पाणीसाठा नाही, असे सांगून अधिकारी मोकळे होत आहेत. तर शिल्लक पाणी जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या आदेशानंतर सोडला जाईल, अशी उडवाउडवीचे उत्तर शेतकऱ्यांना व लोकप्रतिनिधींना ओवारा प्रकल्पाचे अधिकारी देत आहेत.
जवळपास अनेक वर्षांपासून तयार झालेले कालवे फुटत आहेत. त्यांच्यावर चालढकल काम करून शेतकऱ्यांची सांत्वना केली जाते. मात्र वस्तुस्थिती एवढी गंभीर आहे की कालवे नादुरूस्त असल्याने पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊ शकत नाही. हा प्रकार तब्बल दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. कालव्याच्या कामाकरिता बजेटमध्ये निधी नाही. निधी आल्यानंतर काम सुरू होईल, अशी उडवाउडवीचे उत्तरे अधिकारी देत आहेत.
आता पावसाळा लागण्याच्या काळ जवळ आला आहे. निधी आल्यानंतर काम केव्हा होईल, याबाबद शंका असून पावसाळ्यात कालव्याची कामे होणार नाहीत व शेतकऱ्यांना खरीप पिकाकरिता पाणी मिळणार नाही, अशी येथील अधिकाऱ्यांची कार्यपध्दती आहे.
देवरी येथील जुन्या प्रकल्प अधिकारी कार्यालयामागे ओवारा प्रकल्पाचे कार्यालय आहे. मात्र येथील उपविभागीय अधिकारी पालेवार यांचे दर्शन होत नाही. कार्यरत चपराशी कार्यालयात मिळत नाही. शाखा अभियंता यांचे वेळापत्रक निश्चित माहीत नाही. ओवारा प्रकल्पाच्या कालव्या संदर्भात खंत जि.प. सदस्य जियालाल पंधरे यांनी व्यक्त केली आहे.