जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा पॉझिटिव्हिटी रेट होतोय कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 05:00 AM2021-05-29T05:00:00+5:302021-05-29T05:00:02+5:30
जिल्ह्यात शुक्रवारी १८४ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर २६ नवीन रुग्णांची नोंद झाली. २ रुग्णांचा उपचारादरम्यान खासगी आणि शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्ह्यातील मागील २७ दिवसांतील कोरोनाबाधितांच्या आकडेवारी नजर टाकली असता कोरोनाबाधितांचा आलेख सातत्याने डाऊन होत असून, मात करणाऱ्यांची संख्या मात्र दुप्पट वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४००वर आली आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात पूर्णपणे ओसरायला लागली आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने दररोज दीड हजारावर चाचण्या केल्या जात असून, त्यात बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शुक्रवारी जिल्ह्यात १७०६ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यात २६ कोरोनाबाधित आढळले. याचा पॉझिटिव्हिटी रेट १.५२ टक्के आहे. रुग्ण वाढीला ब्रेक लागल्याने पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी १८४ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर २६ नवीन रुग्णांची नोंद झाली. २ रुग्णांचा उपचारादरम्यान खासगी आणि शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्ह्यातील मागील २७ दिवसांतील कोरोनाबाधितांच्या आकडेवारी नजर टाकली असता कोरोनाबाधितांचा आलेख सातत्याने डाऊन होत असून, मात करणाऱ्यांची संख्या मात्र दुप्पट वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४००वर आली आहे. त्यामुळे आता कोरोनाची दुसरी लाट आता पूर्णपणे ओसरायला लागल्याचे संकेत मिळत आहे. मात्र संसर्ग आटोक्यात असला तरी जिल्हावासीयांनी बिनधास्त न होता पूर्वी इतकीच काळजी घेण्याची गरज आहे. आपल्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचा संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या आनुषंगाने आतापर्यंत १,६०,९२७ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,३५,५०७ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १,५५,८९८ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले यापैकी १,३५,०६२ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ४०,५३० कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी ३९,४४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ४०० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर ६८९ स्वॅब नमुन्याचा अहवाल अद्याप प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
जिल्ह्याचा रिकव्हरी दर ९७.३२ टक्के
कोरोनाबाधितांची कमी होत असलेली संख्या आणि कोरोनावर मात करणाऱ्यांचा उंचावत चाललेला ग्राफ यामुळे कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येत आहे. त्यामुळे कोरोना रिकव्हरी दर सातत्याने वाढत आहे. जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी दर ९७.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्याच्या रिकव्हरी दरापेक्षा तो पाच टक्क्यांनी अधिक आहे.
लसीकरणाची अडीच लाखांकडे वाटचाल
कोरोना विरुद्धच्या लढ्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २ लाख ३८ हजार ४०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात १ लाख ८६ हजार ८३४ नागरिकांना पहिला डोस, तर ५१,५६६ नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.