जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट राज्यापेक्षा सरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:22 AM2021-06-05T04:22:29+5:302021-06-05T04:22:29+5:30
गोंदिया : मागील दोन महिन्यांच्या तुलनेत कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने कोरोनाच्या रिकव्हरी ...
गोंदिया : मागील दोन महिन्यांच्या तुलनेत कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने कोरोनाच्या रिकव्हरी रेटमध्ये वाढ झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९४.५४ टक्के आहे, तर गोंदिया जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९७.४२ टक्के आहे. राज्यापेक्षा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ३ टक्क्यांनी सरस असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
शुक्रवारी जिल्ह्यात २३ कोरोनाबाधितांनी काेरोनावर मात केली, तर ६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात हळूहळू कोरोनाबाधितांचा ग्राफ कमी होत असून, मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून बाधितांची संख्या कमी झाल्यास निश्चितच जिल्हा कोरोनामुक्त होईल यात शंका नाही. मात्र, ‘ब्रेक द चेन’अंतर्गत निर्बंध शिथिल होताच शहरातील बाजारपेठ आणि रस्त्यांवरील गर्दी वाढली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १६९४३३ जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यांपैकी १४३९३८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १६२९४० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी १४२०६८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४०९११ कोरोनाबाधित आढळले असून, यांपैकी ३९८५६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ३६४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, ५५५ स्राव नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
..............
२३९० चाचण्या; ६६ पॉझिटिव्ह
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शुक्रवारी १२८२ आरटीपीसीआर, तर ११०८ रॅपिड अँटिजन अशा एकूण २३९० चाचण्या करण्यात आल्या. त्यात ६६ कोरोनाबाधित आढळले. याचा पॉझिटिव्हिटी रेट २.७६ टक्के आहे.
.............
२ लाख ६६ हजार २६८ नागरिकांचे लसीकरण
कोरोना संसर्गाला प्रतिबंध लावण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ६६ हजार २६८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.