पाच दिवसांपासून पॉझिटिव्हिटी रेट एक टक्केच्या आतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:20 AM2021-06-10T04:20:31+5:302021-06-10T04:20:31+5:30
गोंदिया : जिल्ह्याभोवतीचा कोरोनाचा विळखा आता पूर्णपणे शिथिल होत आहे. बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून, कोरोनावर मात करणाऱ्यांचा ...
गोंदिया : जिल्ह्याभोवतीचा कोरोनाचा विळखा आता पूर्णपणे शिथिल होत आहे. बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून, कोरोनावर मात करणाऱ्यांचा आलेख वाढत आहे. मागील पाच दिवसांपासून कोरोना बाधितांचा पाॅझिटिव्हिटी रेट एक टक्केच्या आतच असल्याचे दिलासादायक चित्र आहे, तर कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या केवळ २८१ वर आली आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी (दि. ९) जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने एकूण २,८१३ आरटीपीसीआर आणि अँटिजन स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात २३ स्वॅब नमुने कोरोना पाॅझिटिव्ह आले. याचा पॉझिटिव्हिरेट ०.८२ टक्के आहे, तर ४४ बाधितांनी कोरोनावर मात केली असून, दोन बाधितांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १,७२,९९२ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,४७,५८९ नमुने निगेटिव्ह आले. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यांतर्गत १,७२,५८९ नमुने तपासणी करण्यात आले. त्यात १,५१,६८२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४०,९८३ कोरोना बाधित आढळले असून, यापैकी ४०,००६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत २८१ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर १४८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
...........
संसर्गात घट तरी चाचण्या वाढल्या
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने चाचण्या करणाऱ्यांचे प्रमाण जिल्ह्यात अलीकडे वाढले आहे. कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात आटाेक्यात आहे. मात्र, यानंतरही जिल्ह्यात दररोज साडेतीन हजारांवर चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे कोरोनाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
............
२ लाख ८७ हजार नागरिकांचे लसीकरण
कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी जिल्ह्यात व्यापक स्वरुपात १४० लसीकरण केंद्रांवरून लसीकरण केले जात आहे. यांतर्गत आतापर्यंत २ लाख ८७ हजार ७५७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या दोन लाखावर आहे, तर दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.
....................
मास्कचा करा नियमित वापर
सोमवारपासून जिल्ह्यात अनलॉक करण्यात आले. मात्र, यामुळे नागरिक पुन्हा बिनधास्तपणे वागत आहेत. अनेकांनी मास्कचा वापर करणे बंद केले आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे.
.........