पोस्टल कर्मचाऱ्यांनी नोंदविला काळ्या फिती लावून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 11:32 PM2018-11-01T23:32:47+5:302018-11-01T23:35:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सांगली जिल्ह्यातील जत तसेच अलाहाबाद येथील प्रयागराज कचेरी मुख्य पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सांगली जिल्ह्यातील जत तसेच अलाहाबाद येथील प्रयागराज कचेरी मुख्य पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याच्या निषेधार्थ येथील मुख्य पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गुरूवारी (दि.१) काळ्या फिती लावून घोषणा देत निषेध नोंदविला.
गुरूवार व शुक्रवार (दि. २) असे दोन दिवस हे कर्मचारी काळ्या फिती लावून घटनेचा निषेध नोंदवित आरोपींवर कारवाईची मागणी करणार आहे. सांगली जिल्ह्यातील जत येथील टपाल कार्यालयात बुधवारी तर अलाहाबादच्या प्रयागराज येथील मुख्य पोस्ट कार्यालयात शनिवारी कर्मचाऱ्यांना मारहाण तसेच कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.
या घटनांची दखल घेत नॅशनल फेडरेशन आॅफ पोस्टल एम्प्लॉईज युनियन ग्रुपी सी आणि डी यांच्यावतीने येथील मुख्य पोस्ट कार्यालयासमोर गुरूवारी काळ्या फिती लावून कर्मचाºयांनी निषेध नोंदविला. अशा घटना पुढे घडू नये यासाठी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली.
देशव्यापी या आंदोलनांतर्गत येथील मुख्य कार्यालयातील सुमारे १०० तर जिल्ह्यातील ११ टपाल कार्यालयातील सुमारे ३०० कर्मचारी यात सहभागी आहेत.
काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यासाठी शुक्रवारी (दि.२) हे कर्मचारी पुन्हा एकत्र येणार असून गेट मिटींगमधून घटनेचा निषेध नोंदविणार आहेत. तसेच त्यानंतरही आरोपींवर कारवाई न झाल्यास अनिश्चीतकालीन देशव्यापी कामबंद आंदोलन केले जाणार असल्याचे संघटनेचे सचिव सहदेव सातपुते, पोस्टमास्तर एच.आर.लांजेवार, सहसचिव प्रवीण शुक्ला, पराग बडोले, नितीन चव्हाण, पवन वाठोरे, योगेश कटरे, भागचंद शेंडे यांनी सांगीतले.