योजनेचे पोस्टर लावून प्रशासन झाले मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 11:57 PM2018-06-30T23:57:15+5:302018-06-30T23:57:49+5:30

केंद्र शासनाच्या ग्राम स्वराज अभियानातंर्गत जिल्ह्यातील तीन गावांची निवड करुन त्या गावांमध्ये सात योजनांची अंमलबजावणी करायची होती. मात्र अंमलबजावणी तर सोडाच या योजनांची माहिती तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना नाहीच.

Posters of the scheme can be administered free of cost | योजनेचे पोस्टर लावून प्रशासन झाले मोकळे

योजनेचे पोस्टर लावून प्रशासन झाले मोकळे

Next
ठळक मुद्देघोगरावासीयांची उपेक्षा : अधिकारी अनभिज्ञ, ग्राम स्वराज योजना कागदावर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्र शासनाच्या ग्राम स्वराज अभियानातंर्गत जिल्ह्यातील तीन गावांची निवड करुन त्या गावांमध्ये सात योजनांची अंमलबजावणी करायची होती. मात्र अंमलबजावणी तर सोडाच या योजनांची माहिती तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना नाहीच. याच योजनेतंर्गत निवड केलेल्या तिरोडा तालुक्यातील घोगरा येथे या योजनांचे अजब वास्तव समोर आले. प्रशासनाने या गावात योजनेचे पोस्टर लावून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करणे टाळले. त्यामुळे येथील गावकऱ्यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
तिरोडापासून १५ किमी अंतरावर घोगरा हे दोन हजार लोकवस्तीचे गाव आहे. हे गाव विकासापासून वंचित असल्याने या गावाची केंद्र सरकारने ग्राम स्वराज योजनेतंर्गत निवड केली. विविध योजना राबवून गावाचा खुंटलेला विकास दूर करु असे स्वप्न येथील गावकऱ्यांना दोन महिन्यापूर्वी दाखविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी न झाल्याने गावकऱ्यांसाठी हे सर्व एक स्वप्नच ठरल्याचे वास्तव या गावाला प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर पुढे आले. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने मागासलेल्या गावांचा विकास करण्यासाठी ग्राम स्वराज अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. यातंर्गत गोंदिया जिल्ह्यातील घोगरा, कुंभारटोली, येरंडी या तीन गावांची निवड केली. निवड केलेल्या गावांमध्ये ‘सबका साथ सबका गाव सबका विकास’ या विशेष मोहीमेतंर्गत प्रधानमंत्री उजाला योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना व मिशन इंद्रधनुष्य या सात योजना शंभर टक्के राबविण्याचे निर्देश दिले होते. या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी निवड केलेल्या गावांमध्ये पालकमंत्री व केंद्रीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित मोठा कार्यक्रम घेण्यात आला. १४ एप्रिल ते ५ मे दरम्यान ग्राम स्वराज अभियानातंर्गत या सात योजनांचा शंभर टक्के गावातील लाभार्थ्यांना द्यायचा होता. मात्र या योजनांचा लाभ तर दूरच राहिला योजनांची माहिती तिरोडा तहसीलदार, ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांनाच नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली. दरम्यान या योजनांची तिरोडा तालुक्यातील घोगरा गावात किती टक्के अंमलबजावणी झाली. याचा मागोवा घेण्यासाठी शनिवारी (दि.३०) या गावाला भेट दिली असता या योजनेचे भयान वास्तव पुढे आले. या गावाला भेट देवून गावकऱ्यांना या योजनाविषयी विचारले असता त्यांनी या योजनांची माहिती नसल्याचे व १४ एप्रिलचा कार्यक्रम आटोपल्यानंतर एकही अधिकारी गावाकडे भटकलाच नसल्याचे सांगितले. शासनाने गावाचा विकास करण्यासाठी कार्यक्रम घेवून योजनांचा लाभ देण्याचा मोठा गाजावाजा केला. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने आमची दिशाभूल केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला.
योजनांचा लाभ द्यायचा नव्हता तर आम्हा गावकऱ्यांना मोठी स्वप्न कशासाठी दाखविली असा संप्तत सवाल उपस्थित केला. या योजना तर सोडाच शिधापत्रिकेसाठी साधा अर्ज मिळत नसल्याचे सांगत गावकºयांनी संताप व्यक्त केला.
इंद्रधनुष्य योजना म्हणजे पोस्टर लावणे
ग्राम स्वराज अभियानातंर्गत निवड केलेल्या गावात सात योजना राबवायच्या आहेत. त्यात मिनश इंद्रधनुष्य या आरोग्य विषयक योजनेचा समावेश आहे. या योजनेतंर्गत बालकांना प्रतिबंधात्मक लसीकरण, आरोग्य तपासणीे तसेच आरोग्य विषयक योजना राबविण्याचे निर्देश होते. मात्र आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावातील घरांच्या भिंतीना पोस्टर लावण्यापलिकडे काहीच केले नाही. त्यामुळे इंद्रधनुष्य योजनेची माहिती आहे असे गावकऱ्यांना विचारले असता त्यांनी इंद्रधनुष्य योजना म्हणजे गावात पोस्टर लावणे असल्याचे सांगितले.
रॉकेल मिळणे झाले बंद
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतंर्गत लाभार्थ्यांना अनुदानावर गॅस सिलिंडर वाटप केले जात आहे. ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांना रॉकेलचे वाटप करु नये, असे शासनाचे निर्देश आहे. तर काही लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर अद्याप मिळाले नाही. मात्र त्यांना आता रॉकेलही मिळत नसल्याने योजनेचा लाभ मिळाला नाह. उलट मिळत असलेले रॉकेल सुध्दा मिळणे बंद झाल्याचे येथील गावकऱ्यांनी सांगितले.
शिधापत्रिकेचा अर्ज मिळेना
केंद्र शासनाच्या सात योजनाचा लाभ मिळणे तर सोडाच येथील गावकऱ्यांना मागील दोन महिन्यापासून शिधापत्रिका तयार करण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज मिळत नाही. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी लागणारे कागदपत्रे तयार करण्यासाठी मोठी अडचण जात असल्याचे रत्नमाला टेंभरे, कुलताबाई बागडे, खुशाल भोंडेकर यांनी सांगितले.
कार्यक्रम शासनाचा भुर्दंड ग्रामपंचायतला
ग्राम स्वराज योजनेतंर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांची गावकºयांना माहिती देण्यासाठी १४ एप्रिलला घोगरा येथे मोठा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमासाठी ४० हजार रुपयांच्या खर्च करुन त्यांचे बिल ग्रामपंचायतच्या नावावर फाडण्यात आले. गावकऱ्यांना योजनेचा लाभ तर मिळाला नाही उलट ४० हजार रुपयांचा भुर्दंड सोसावा लागल्याचे सरपंच गिता देव्हारे, उपसरपंच रुपेश भेंडारकर यांनी सांगितले.

Web Title: Posters of the scheme can be administered free of cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.