जिल्ह्यातील ५८३ गावांत एप्रिलमध्ये डोक्यावर येणार हंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:56 AM2021-03-04T04:56:21+5:302021-03-04T04:56:21+5:30
गोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी आणि सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणी साठा असला तरी यंदा ...
गोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी आणि सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणी साठा असला तरी यंदा एप्रिल ते जून महिन्यात जिल्ह्यातील ५८३ गावांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या भूवैज्ञानिकांनी निरीक्षण विहिरींवरून ही बाब पुढे आली आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे दरवर्षी तीन टप्प्यांत जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आराखडा तयार केला जातो. यांतर्गत भूवैज्ञानिक जिल्ह्यात निश्चित केलेल्या निरीक्षण विहिरीची पाणी पातळी मोजून हा आराखडा तयार करीत असतात.
२४ फेब्रुवारीला तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार जिल्ह्यातील ५८३ गावांमध्ये एप्रिल ते जून महिन्यादरम्यान पाणीटंचाईची समस्या निर्माण होणार आहे. यात ४४२ मोठी गावे, तर १३१ लहान गावांचा समावेश आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे.
संभाव्य पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १६४७ उपाययोजनांचा आराखडा तयार केला असून, त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.
जिल्ह्यात केवळ सहा विहिरींचे अधिग्रहण
जिल्ह्यात मार्च महिन्यापर्यंत पाणीटंचाईची फारशी समस्या जाणवणार नाही. मात्र, एप्रिल ते जूनदरम्यान काही गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या अधिक बिकट हाेऊ शकते. त्यामुळे या गावांमध्ये उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने उपाययोजना सुरू केल्या.
२२३ विंधनविहिरी तयार करणार
संभाव्य पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी १६४७ उपाययोजनांचा आराखडा तयार केला असून, त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी २२३ बोअरवेलचे खोदकाम, ११९६ बोअरवेलची दुरुस्ती, १४६ विहिरींमधील गाळाचा उपसा करण्यात येणार आहे.
दरवर्षी केल्या जातात उपाययाेजना तरी समस्या
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठ्यांतर्गत दरवर्षी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातोे. मात्र यानंतरही पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. मागील वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. पण यानंतरही पाणीटंचाईची समस्या कायम राहत आहे. त्यामुळे या उपाययोजनांवर नेमका खर्च केला जातो किंवा नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे दरवर्षी ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्या तोंड द्यावे लागत आहे.
कायमस्वरूपी उपाययोजना करा
तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाईची समस्या गंभीर होत चालली आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील ३०० गावात तर यंदा ५८३ गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावकऱ्यांना आतापासून याची चिंता लागली आहे. तहान लागली की विहिरी खोदणे, बोअरवेलचे खोदकाम केले जाते. दरवर्षी उन्हाळ्याच्या तोंडावर उपाययोजना केल्या जातात. त्यामुळे नियोजन ढासळत आहे. पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सर्व बाबींचा अभ्यास करून उपाययोजना करण्याची गरज आहे, तरच ही समस्या मार्गी लागू शकते.