९६ गावांना पुराचा संभाव्य धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:18 AM2021-07-12T04:18:34+5:302021-07-12T04:18:34+5:30
गोंदिया : मान्सून कालावधी सुरू झाला असून, जिल्ह्यातील ९६ गावांना पुराचा संभाव्य धोका आहे. यासाठी जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी ...
गोंदिया : मान्सून कालावधी सुरू झाला असून, जिल्ह्यातील ९६ गावांना पुराचा संभाव्य धोका आहे. यासाठी जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी शनिवारी (दि. १०) संभाव्य पूरपरिस्थिती असलेल्या गोंदिया तालुक्यातील बिरसोला, भदयाटोला, कासा, पुजारीटोला, मरारटोला, ब्राह्मणटोला व काटी या गावांना भेट देऊन मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने केलेले नियोजन व भौगोलिक परिस्थितीची पाहणी केली.
जिल्ह्यात मागीलवर्षी २०२०मध्ये ऑगस्ट महिन्यात गोंदिया व तिरोडा या दोन तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पूरपरिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे, घर, गोठे इत्यादींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी प्रत्यक्ष पूरप्रवण गावांना भेट देऊन तेथील भौगोलिक परिस्थिती व पूर येण्याची कारणे तसेच शोध व बचाव करण्याकरिता
प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती उपस्थित प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून घेतली. वैनगंगा व बाघ नदीच्या काठावर असलेली गावे व त्यातील खोलगट भागातील घरांमध्ये पुराच्या पाण्यामुळे होणारे नुकसान व शासनाकडून तत्काळ मदत देण्याकरिता बोटीची व मनुष्यबळाची पुरेशी व्यवस्था इत्यादींबाबत जिल्हाधिकारी यांनी विस्तृत माहिती घेतली. यावेळी उपस्थित गावकऱ्यांशी जिल्हाधिकारी यांनी संवाद साधून त्यांच्यादेखील समस्या जाणून घेतल्या. अपर तहसीलदार अनिल खडतकर, नायब तहसीलदार जी. पी. शिंगाडे, पूर नियंत्रण अधिकारी रमेश मेश्राम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, रावणवाडी पोलीस निरीक्षक उमेश पाटील, मंडल अधिकारी एन. बी. वर्मा, डी. एच. पोरचेट्टीवार, तलाठी जी. पी. सोनवाने व ए. एल. वालोदे, बिरसोलाचे सरपंच सरोजिनी दांदळे, उपसरपंच देवलाल जंभरे, पोलीसपाटील दिलीप तुरकर, कासा गावचे सरपंच कृष्णी मरठे, पोलीसपाटील रमेश येसने, कोतवाल पिंटू बागडे उपस्थित होते.
.............
पावसाळ्यात तुटतो संपर्क
या भागात पूल व रस्त्यांची उंची कमी असल्यामुळे पूरपरिस्थितीच्या वेळेस एका गावाचा दुसऱ्या गावाशी संपर्क पूर्णपणे तुटतो. म्हणून या भागात असलेल्या पुलांची व रस्त्यांची उंची वाढविण्यासाठी गावकऱ्यांनी विनंती केली. उन्हाळी पीक घेण्यासाठी या भागात पाणी
पुरविण्यासाठी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची यावेळी गावकऱ्यांनी मागणी केली.
.............
जिल्हाधिकारी यांनी केला त्या आजीचा सत्कार...
गोंदिया तालुक्यातील मरारटोला या गावातील जमरे कुटुंब यांचे निवास अत्यंत खोलगट भागात असून, दरवर्षी पूरपरिस्थितीमध्ये पुराचे पाणी त्यांच्या घरात शिरते. त्यामुळे या कुटुंबीयांना दरवर्षी सुरक्षित स्थळी हलविण्यात येते. हे कुटुंब संयुक्त कुटुंब पध्दतीने राहात असून, कुटुंबातील सदस्यांची संख्या ४४ एवढी आहे. या कुटुंबातील प्रमुख ८५ वर्षांची वयोवृध्द आजी कारीबाई रामचंद जमरे यांनी मागीलवर्षी
उदभवलेल्या पूरपरिस्थितीवर मात करून कुटुंबीयांचे व स्वत:चे संरक्षण केल्यामुळे जिल्हाधिकारी खवले यांनी त्या आजीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
.............