दीपावलीचा पर्व तेजोमय करणारा कुंभार समाज मात्र उपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 06:00 AM2019-10-21T06:00:00+5:302019-10-21T06:00:20+5:30
सध्या चिनीमाती व प्लास्टर ऑफ पेरीस पासून तयार आकर्षक व कलाकुसरी असलेल्या पणत्या, धुपजाळी, मापुले याकडे ग्राहक आकर्षक होत आहेत. त्यामुळे कुंभाराने चाकावर तयार केलेल्या पारंपारिक मातीच्या पणत्या, मापुले व धुपजाळ्याकडे ग्राहकांची पाठ फिरवत चालले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : लक्ष्मीपुजनासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीच्या पणत्या व मापुले घडविणाºया, दिवाळीला प्रकाशमय बनवून उजळून टाकणाऱ्या कुंभार समाजाचे भविष्य मात्र अंधकारमय आहे. बाजारात, शहरातील चौकाचौकात इंग्रजी माती व प्लास्टर आॅफ पेरीस, चिनी बनावटीच्या पणत्यांची दुकाने थाटल्यामुळे ग्राहक पारंपारिक मातीच्या पणत्याकडे पाठ फिरवित आहेत. त्यामुळे कुंभाराने बनविलेल्या मातीच्या पणत्यांची मागणी घटली आहे. आधुनिक युगातील लघु उद्योग व पारंपारिक व्यवसायाला उभारी देण्यासाठी शासनस्तरावर साधन उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचे कुंभार समाजातील युवा व्यवसायी लोकेश पात्रे यांनी सांगीतले.
सध्या चिनीमाती व प्लास्टर ऑफ पेरीस पासून तयार आकर्षक व कलाकुसरी असलेल्या पणत्या, धुपजाळी, मापुले याकडे ग्राहक आकर्षक होत आहेत. त्यामुळे कुंभाराने चाकावर तयार केलेल्या पारंपारिक मातीच्या पणत्या, मापुले व धुपजाळ्याकडे ग्राहकांची पाठ फिरवत चालले आहेत. त्यामुळे याचा परिणाम कुंभाराच्या व्यवसायावर झाला असून डबघाईस आल्याने उतरती कळा लागली आहे.
लाकडी चाकावर पणत्या, मापुले, धुपजाळ्या, भगुले, मातीचे माठ तयार करुन लाकडाच्या भट्टीत भाजली जातात. गेरुच्या पाण्यात बुडवून त्याला रंग दिला जातो. या सगळ्या प्रक्रीयेतून मोठ्या कष्टाने तयार केलेल्या पारंपारिक वस्तुंकडे ग्राहकांनी मात्र आता पाठ फिरविली आहे.
आधुनिक काळात स्पर्धेत टिकण्यासाठी मातीची उपलब्धता, विजेवर चालणारी चाके, माती मळणी यंत्र यासारखी अत्याधुनिक साधने शासनाकडून या कारागिरांना पोहोचविणे गरजेचे आहे.
राज्यातील काही जिल्ह्यात अशी आधुनिक साधने दिली गेलीत. मात्र गोंदिया जिल्ह्यातील कुंभार कारागिरांना मिळाली नाही. अत्याधुनिक साधने, वित्तपुरवठा, कर्ज, शासकीय मदत व प्रशिक्षण या गोष्टींपासून येथील कुंभार वंचित आहेत.
सर्वांची दिवाळी तेजोमय करणारा कुंभार समाज मात्र उपेक्षीतच राहीला. उतरती कळा लागलेल्या या कुंभार व्यवसायाला उभारी देण्यासाठी शासनाने सर्वोपरी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा कुंभार समाजबांधवांनी केली आहे.