प्रत्येक तालुक्यात कुक्कुट प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:26 AM2018-02-01T00:26:49+5:302018-02-01T00:27:05+5:30
नॅश्नल इन्स्टिट्यूट आॅफ न्यूट्रीशनच्या शिफारशीनुसार प्रती व्यक्ती दरवर्षी १८० अंड्यांची आवश्यकता आहे. मात्र महाराष्ट्रात प्रती व्यक्ती केवळ ४१ अंडी उपलब्ध होतात. गरजेच्या तुलनेत हे उत्पादन फारच कमी आहे. त्यामुळे अंडी उत्पादनात वाढ करण्यासाठी कुक्कूट पालनाला वाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नॅश्नल इन्स्टिट्यूट आॅफ न्यूट्रीशनच्या शिफारशीनुसार प्रती व्यक्ती दरवर्षी १८० अंड्यांची आवश्यकता आहे. मात्र महाराष्ट्रात प्रती व्यक्ती केवळ ४१ अंडी उपलब्ध होतात. गरजेच्या तुलनेत हे उत्पादन फारच कमी आहे. त्यामुळे अंडी उत्पादनात वाढ करण्यासाठी कुक्कूट पालनाला वाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एकात्मीक कुक्कूट प्रकल्प उभारण्यात येणार आहे. राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जाणकर यांनी नुकतीच जिल्ह्यात भेट देऊन या प्रकल्पासाठी जागेची पाहणी केली.
अंडी-प्राणीजन्य प्रथिनांचा किफायतशीर स्त्रोत, आहार तज्ज्ञांची विशेष पसंती, किफायत दर, भेसळ विरहीत, पोषणमुलतत्व, कुपोषण समस्येवरील प्रभावी उपाय म्हणून अंडीचा मोठ्या प्रमाणात वापर होते. देशातील ५० लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा व दरवर्षी ८० हजार ते एक लाख कोटीची उलाढाल करणारा शेती सलग्न पूरक व्यवसाय कुक्कूटपालन आहे. यासाठी ७७ टक्के संघटीत क्षेत्र तर २३ असंघटित क्षेत्र आहे.
गोंदिया जिल्ह्यात १ कोटी ४ लाख ३६ हजार अंडी सुधारित कुक्कूट जातीपासून तर २ कोटी ३८ लाख ७६ परसातील कुक्कूटपक्षी असे एकूण ३ कोटी ४३ लाख १२ हजार अंडीचे जिल्ह्यात उत्पादन होते. जिल्ह्याची स्थिती पाहता दरडोई १३९ अंड्यांची कमी उत्पादन होत असल्याचे चित्र आहे. हे चित्र पालटण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एकात्मीक कुक्कूट प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी हे प्रकल्प कोणत्या ठिकाणी राहतील यासाठी जागेची पाहणी करण्यात आली. अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या कुंभीटोला बाराभाटी येथील जागेची पाहणी केली. गोंदिया जिल्ह्यात ५ लाख ८१ हजार २४९ कोंबड्या आहेत. अंडी उत्पादनात देश जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात ६९.७३ अब्ज अंडी उत्पादन वर्षाकाठी होते. अंडी उत्पादनात तामीळनाडू देशात प्रथम क्रमांकावर आहे. १६.१२ अब्ज अंडी उत्पादन तामीळनाडूमध्ये होते. महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर असून उत्पादन ५.२९ अब्ज अंड्यांचे आहे.
प्रत्येक प्रकल्प १० लाखांचा
एकात्मिक कुक्कूट प्रकल्प प्रत्येक तालुक्यात उभारण्यात येत असल्याने प्रत्येक प्रकल्पासाठी १० लाख रूपये खर्च येणार आहे. हे प्रकल्प खासगी व्यक्तींना उभारायचे आहे. अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील लाभार्थ्याला ७५ टक्के अनुदान, तर सामान्य प्रवर्गातील लाभार्थ्याला ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. या प्रकल्पात सुरूवातीला २ हजार कोंबड्या खरेदी करुन त्यांच्यापासून मिळालेली अंडी मशीनमध्ये टाकल्या जाणार आहेत. २१ दिवसानंतर त्या अंड्यापासून निघालेले पिल्लू शासकीय योजनांना व इतर इच्छुक लाभार्थ्यांना वाटप केली जाणार आहेत. जिल्ह्यात गोरेगाव व कुंभोटोला बाराभाटी येथे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत.
अंडी खाण्याचे हे फायदे
अंडी खाण्याचे अनेक फायदे आहेत. शून्य ट्रान्स फेंट, एकाग्रता वाढविते, स्तनाचा कर्करोग होण्यापासून वाचविते, गर्भवती महिलांसाठी अतिउपयुक्त स्ट्रोक आणि हृदयविकारापासून दूर ठेवते. अंडीमध्ये सर्वात जास्त प्रथीने असतात. अंडी हे सर्व वयोगटातील लोकांना सहज आर्थिकष्दृट्या सर्व वर्गातील लोकांना परवडणारे मानवी शरीरासाठी आवश्यक पोषणमुल्य आहे. अंडीत संतुलीत प्रमाण, भेसळयुक्त व कुपोषण समस्येवर प्रभावी उपाय म्हणून अंडी काम करतात.
शासनाच्या या उपक्रमामुळे अंडीचा तुटवडा भासणार नाही. जिल्ह्यातच मुबलक प्रमाणात अंडी उपलब्ध होतील. यातून लोकांना रोजगारही मिळेल. कुपोषणावर मातकरायला हे प्रकल्प सोयीस्कर ठरतील.
-डॉ. राजेश वासनिक
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
जि.प. गोंदिया.