‘ग्रामगीते’तच जीवन जगण्याचे सामर्थ्य
By admin | Published: January 22, 2017 01:00 AM2017-01-22T01:00:41+5:302017-01-22T01:00:41+5:30
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अगदी साध्या व सोप्या भाषेत सर्वसामान्य बहुजन समाजाला समजावून दिले आहे.
हभप प्रशांत ठाकरे महाराज : बोंडगावदेवी येथे ग्रामगीता संगीतमय प्रवचन
बोंडगावदेवी : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अगदी साध्या व सोप्या भाषेत सर्वसामान्य बहुजन समाजाला समजावून दिले आहे. अशी पवित्र ग्रामगीता लिहून ठेवली. तुकडोजीच्या ग्रामगीतामध्ये अखिल मानवजातीचे कल्याण दडले आहे. जगात अनेक धार्मिक पोथ्या, पारायण, ग्रंथ लिहिल्या गेली. परंतु ग्रामगीता एक पवित्र गं्रंथ आहे. पारायण करण्यासाठी ग्रामगीता नसून आचरण करण्यासाठी आहे. समाजातील युवकांनो जागे व्हा. राष्ट्र जागवा हाताला हात धरुन पूजा होत नाही. गावात वावरणारे सामान्य जनता देव आहे, असे ग्रामगीता सांगते. वंदनीय तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता मध्येच खरा जीवन जगण्याचे सामर्थ्य दडलेले असल्याचे उदगार गुरुकुंझ मोझरी आश्रमाचे हभप युवा प्रवचनकार प्रशांत ठाकरे यांनी केले.
बोंडगावदेवीच्या बाजार चौकात सार्वजनिक समाज मंदिरात आयोजित ७ दिवसीय ग्रामगीता संगीतमय कथा प्रवचनात ग्रामस्थांना प्रबोधन करतांना ते बोलत होते. सर्वप्रथम त्यांनी मानवी जिवनात प्रार्थनेलाा महत्व कसे आहे याबद्दल सविस्तर विवेचन केले. प्रार्थनामुळे बालवयातील मुलांना लहानपणाला सुशोभित करणारे संस्कार, युवकांना त्यागाची, म्हातारपणात नामस्मरणाची संधी प्राप्त होते. मानवी मन विचलित न होता प्रार्थना एकाग्रता शिकविते. मानव जातीच्या कल्याणासाठी तुकडोजी महाराजांनी प्रार्थना सांगितलेली असल्याचे म्हटले. सामान्य माणसाला जीवन जगण्याचे सामर्थ्य देऊन लोक कल्याणार्थ संदेश देण्याचे काम ग्रामगीता करीत आहे. अमूल्य असा ठेवीचा ग्रंथ आहे. देशाला ग्रामगीतेची गरज आहे. तुकडोजी महाराज पंढरपूरला बसून विश्वाची चिंता करीत होते. ४ हजार ६६७ ओव्यांचा अंतर्भाव असलेला पवित्र अशी ग्रामगीता लिहून त्यांनी बहूजन समाजावर अनंत उपकार केलेले आहेत. कर्मयोगी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांचे विचार समाजाला तारणारे आहेत. मानवाच्या जगण्याचे सारे सार ग्रामगीतामध्ये आहे. माझं गाव मंदिर आहे. कोणत्या मंदिरात जाण्याची गरज नाही. ‘रिकामा कशाला फिरत, तुझ गावच नाही का? तिर्थ’ अशी राष्ट्रसंताची शिकवणूक असल्याचे त्यांनी प्रवचनात सांगितले.
काल्पनीक कल्पना करुन देशात अनेक ग्रंथाचे लिखाण करण्यात आले आहे. परंतु तुकडोजी महाराजांची ग्रामगीता नाविण्यपूर्ण आहे. समस्त साधू-संताचे लोकांना उपयोगी पडणारे विचार अत्यंत साध्या भाषेतून तुकडोजींनी ग्रामगीतेमधून सांगितले आहे. बदलत्या काळाची सूत्र ओळखून गीतेमध्ये सार आहे. कोणाच्या अंगात, मंदिरात देव बसला नसून खरा देव आपल्या अर्तमनात आहे अशी ग्रामगीता शिकविते. जो माणूस कष्ट करुन इतरांना जगवितो तोच खरा देव आहे. देवाच्या नावावर दर्शन दाखविण्याचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्यांची संख्या समाजात कमी नाही असे त्यांनी प्रवचनातून सांगितले. नैवद्य, नारळ अर्पण केल्याने देव पावत नाही. देव फक्त भावाचा-प्रेमाचा भुकेला आहे. वंदनीय तुकडोजी महाराजांनी कधीही यज्ञ केला नाही. समाजातील सर्व साधूसंताचे विचार अत्यंत साध्या सरळ भाषेतून तुकडोजी महाराजांनी ‘ग्रामगीता’ मधून मांडले आहे. ते विचार आत्मसात करा. बदलत्या काळाची परिस्थिती ओळखूनच ग्रामगीताचा सार आहे. जो आपल्या कामाशी प्रामाणिक, नितिमत्तेनी वाचतो तोच खरा मानव आहे. घरामध्ये होम-यज्ञ करणाऱ्याचे कित्येक पिढ्या बर्बाद झाल्या. इंद्रियावर ताबा मिळविण्याचे मर्म गाडगेबाबांनी सांगितले. समस्य बहुजन समाजाला मुक्तीचा, जगण्याचा मार्ग वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अप्रतिम अशा ग्रामगीतामधून विषद केला आहे. घरोघरी ग्रामगीताचे वाचन आवश्यक असल्याचे हभप प्रशांत ठाकरे यांनी आपल्या प्रवचनातून सांगितले.(वार्ताहर)