नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रावर रानगव्यांची सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 11:36 PM2019-07-09T23:36:50+5:302019-07-09T23:37:46+5:30
बौद्ध पौर्णिमेच्या दिनी चंद्राच्या प्रकाशात करण्यात आलेल्या यंदाच्या निसर्गानुभव मचान निरीक्षणात येथील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात रानगव्यांची संख्या अधिक आढळली. त्यामुळे या क्षेत्रावर रानगव्यांची सत्ता असल्याचे आढळले.
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बौद्ध पौर्णिमेच्या दिनी चंद्राच्या प्रकाशात करण्यात आलेल्या यंदाच्या निसर्गानुभव मचान निरीक्षणात येथील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात रानगव्यांची संख्या अधिक आढळली. त्यामुळे या क्षेत्रावर रानगव्यांची सत्ता असल्याचे आढळले. व्याघ्र राखीव क्षेत्रात तीन ठिकाणांवरून करण्यात आलेल्या निरीक्षणात सर्वाधिक ३५३ रानगव्यांची नोंद घेण्यात आली आहे. यावरून व्याघ्र राखीव क्षेत्रात रानगवेच जास्त असल्याचे स्पष्ट होते.
गोंदिया जिल्हा जंगलांचा जिल्हा असतानाच नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र हे जिल्ह्याला लाभलेले वरदानच आहे. व्याघ्र राखीव क्षेत्रामुळे जिल्ह्याची राष्ट्रीयच काय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुध्दा ख्याती आहे.
वाघोबा सह अन्य वन्यप्राण्यांचे वस्तीस्थान असलेल्या या व्याघ्र राखीव क्षेत्रात पर्यटक मोठ्या आशाने वन्यप्राण्यांच्या दर्शनासाठी येतात. या राखीव क्षेत्रातील वन्यप्राण्यांची संख्या मोठी असताना नेमका त्याचा अंदाज घेणे सुद्धा गरजेचे असल्याने दरवर्षी बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाशात प्राणी गणना केली जाते. त्यालाच निसर्गानुभव मचान निरीक्षण म्हटले जात असून मचानवरून प्राण्यांना टिपून त्यांची नोंद घेतली जाते.
त्यानुसार, यंदा १८ मे रोजी नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात निसर्गानुभव मचान निरीक्षण करण्यात आले. या निरीक्षणात सर्वाधीक ३५३ रानगव्यांची नोंद करण्यात आली आहे तर दुसऱ्या क्रमांकावर १९८ माकड व तिसºया क्रमांकावर १७५ रानडुकरांची नोंद करण्यात आली. या तीन वन्यप्राण्यांना सोडून अन्य प्राण्यांची शंभराच्या आतच नोंद घेण्यात आली. विशेष म्हणजे, वाघोबाचे वस्तीस्थान असताना निरीक्षणात वाघोबा दिसलेच नसून फक्त चार बिबट दिसल्याची नोंद आहे.
नवेगावबांध पार्कमध्ये वन्यप्राण्यांचा अधिक वावर
यंदा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत उमरझरी,पिटेझरी व नवेगावपार्क येथे निसर्गानुभव मचान निरीक्षण करण्यात आले व त्यात एकूण ९८७ वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आली.यात उमरझरी येथे ३४३, पिटेझरी येथे ६२ तर नवेगाव पार्क येथे सर्वाधीक ५८२ वन्याप्राण्यांची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, येथेच २८६ रानगव्यांची नोंद घेण्यात आली असतानाच उमरझरी येथे चार बिबट्यांची नोंद घेण्यात आली आहे.
निरीक्षणात या वन्यप्राण्यांचे दर्शन
निरीक्षणात वाघोबाचे दर्शन कुणालाच झाले नाही. मात्र बिबट-चार, अस्वल- ४०, चांदी अस्वल- एक, रानकुत्रे- ३४, खवल्या मांजर-पाच, मुंगूस- तीन, मसण्या उद- सात, रान मांजर-आठ, सापाळ(सारई)- नऊ, रानडुकर- १७५, रानगवा- ३५३, चितळ-२२, हरिण- एक, निलगाय-२६, सांबर-४३, भडकी- एक, ससा-तीन, लंगूर (वानर)- तीन, माकड-१९८, मोर-३९, उदमांजर-चार, घार-सहा, घुबड-एक तर एक सुतार दिसून आले आहे.