नाट्य कलावंत करताहेत ४० वर्षांपासून मनोरंजनातून प्रबोधन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:31 AM2021-08-27T04:31:31+5:302021-08-27T04:31:31+5:30
सडक अर्जुनी : गोंदिया जिल्ह्यात अनेक नामवंत कलाकार आहेत. त्यामुळे झाडीपट्टीतील लोककलेची सर्वत्र दखल घेतली जाते. असा एक कलावंत ...
सडक अर्जुनी : गोंदिया जिल्ह्यात अनेक नामवंत कलाकार आहेत. त्यामुळे झाडीपट्टीतील लोककलेची सर्वत्र दखल घेतली जाते. असा एक कलावंत जिल्ह्यात असून मागील ४० वर्षांपासून ते मनोरंजनाचे प्रबोधनपर काम करीत आहेत. त्यांच्या ४० वर्षांतील प्रवाशांचा उलगडा त्यांनी केला.
सन १९८० मध्ये वयाच्या २० व्या वर्षी घरंदाज घराणेशाही, वडील व मोठे भाऊ तमाशाचे शाहीर होते. चुडामन लांजेवार यांचा खोडशिवनी येथे जन्म झाला.त्यांना शाळेत शिकत असताना १० वी पासून छंद लागला व खडीगंमत पाहण्याची व गावात नाटकात काम करणे सुरू झाले. सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक अशा अनेक नाटकांमध्ये डॉ. परसराम खुणे, माणिक शिंदे, प्रभाकर आंबोणे, मधू जोशी, नारायण मेश्राम, मारोती परशु, के. बी. परशु अशा नामवंत कलाकारांसोबत तंट्याभील, स्वर्गावर स्वारी, बिजली कराडली, रक्तात रंगली नाती, अंगार, डाकू मानसिंग अशा अनेक नाटकांत काम केले. स्वत:चे मंडळ काढून भजनाच्या, दंडारीच्या गुरुदेव मंडळाची स्थापना केली. खडीगंमत तमाशाच्या पार्टीत शाहीर तन्नू बिसेन पांढरी यांच्या मंडळात १५ वर्ष काम केले. शाहीर उत्तम आशीर्वाद सावरबंद यांचे सहकारी कलाकार म्हणून काम सुरू आहे. त्यांची दोन्ही मुले सुधीर, राहुल हेसुद्धा कालाकार आहेत. विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे चुडामन लांजेवार जिल्हाध्यक्ष आहेत. मोठमोठे सर्वस्तरीय कलाकारांचे महोत्सव, मेळावे त्यांनी केले आहेत. खोडशिवनी, शेंडा, सावरबंद, जांभळी, लाखनी, लाखोरी, कन्हान, रामटेक, मोरगाव अर्जुनी, ताळगाव अशा ठिकाणी मेळावे सादर करून जी तळागळातील पारंपरिक लोककला आहे ती लोप पावत चालली. तमाशा, दंडार, कीर्तन, भजन, गोंधळ, नाटक, कव्वाली यांना एकत्रित आणून स्टेज देऊन समाजात जागृती घडून यावी यासाठी गावोगावी विदर्भशाहीर कलाकार परिषदेच्या माध्यमातून मेळावे घेऊन त्यांना प्रमाणपत्र दिले. ५० वर्षांनंतर शासन कलाकाराला वयोवृद्ध मानधन मिळते.
........
व्यसनमुक्ती व बेटी बचाओवर जनजागृती
सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईकडून व्यसनमुक्ती, बेटी बचाओ, बेटी पढाओ, गर्भलिंग निदान अशा विषयांवर कार्यक्रम सादरीकरण करून प्रशस्तिपत्र, स्मृतिचिन्ह देऊन मुंबई येथे सांस्कृतिक मंत्री यांच्या हस्ते त्यांना गौरव करण्यात आले. वयोवृद्धांना २२५० रुपये मानधन मिळते. आजही कोरोना कोविड-१९ जनजागृतीचे कार्यक्रम सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईकडून सुरू आहेत. आज ६२ वर्ष पूर्ण झाले. २० वर्षांपासून संत विदेही मोतीरामबाबा, वसंताबाबाकडून उपदेश घेऊन संत मालिका स्वीकारून निर्व्यसनी जीवन जगून कार्य सुरू आहे. अशी ही जीवनगाथा चुडामन लांजेवार यांची आहे.
.............