राज्यात चित्रकलेत प्रज्वल नागपुरे दुसरा तर घोषवाक्य स्पर्धेत आँचल चांदेवार तिसरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:29 AM2021-09-19T04:29:32+5:302021-09-19T04:29:32+5:30
गोंदिया : जागतिक ओझोन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ओटँस्टिकतर्फे आयोजित राज्यस्तरीय पोस्टर डिझाइन, घोषणा लेखन, चित्रकला, ...
गोंदिया : जागतिक ओझोन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ओटँस्टिकतर्फे आयोजित राज्यस्तरीय पोस्टर डिझाइन, घोषणा लेखन, चित्रकला, रांगोळी स्पर्धेत सडक अर्जुनी तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पळसगाव-राका येथील १३ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यापैकी सर्वोत्तम सहा चित्रांची निवड चित्रकला स्पर्धेसाठी व घोषवाक्य स्पर्धेसाठी तीन विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली. इयत्ता सहाव्या वर्गातील विद्यार्थी प्रज्वल भास्कर नागपुरे याने राज्यातून दुसरा क्रमांक तर घोषवाक्य स्पर्धेत आँचल माणिकचंद चांदेवार या विद्यार्थिनीने राज्यातून तिसरा क्रमांक प्राप्त केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी १४ सप्टेंबर २०२१ रोजी ऑनलाइन पद्धतीने महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने जागतिक ओझोन दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. पदवीधर शिक्षक संदीप तिडके व भास्कर नागपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना ओझोन स्तराचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्कृष्ट प्रतिसाद देत शाळेतील १०० टक्के विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यातील निवडक चित्र राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविण्यात आले. तज्ज्ञ कमिटीने राज्यस्तरावरून आलेल्या चित्रांचे मूल्यांकन करून चित्रकला स्पर्धेत शाळेतील इयत्ता ६ वी मधील विद्यार्थी प्रज्वल भाष्कर नागपुरे याने काढलेल्या चित्राला दुसरा क्रमांक मिळाला. घोषवाक्य स्पर्धेसाठी तिसऱ्या पुरस्कारासाठी आँचल माणिकचंद चांदेवार या विद्यार्थिनीची निवड केली. अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, सचिव अशोक शिंगारे, सहसंचालक डाॅ. व्ही.एम. मोटघरे, संचालक संदीप साळवी, डॉ. राकेश कुमार ऋतुजा भसमे, यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांस ५००१ रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र, तिसरे बक्षीस स्वरूपात २००० रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र बक्षीस घोषित करण्यात आले. या वेळी उपसरपंच सुनील चांदेवार, केंद्रप्रमुख डी.झेड. लांडगे, मुख्याध्यापक एस.आर. फुंडे, पदवीधर शिक्षक संदीप तिडके, भाष्कर नागपुरे, नितीन अंबादे, एस.टी. कापगते उपस्थित होते.