राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक प्रतापगड पहाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 11:52 PM2018-02-12T23:52:21+5:302018-02-12T23:52:39+5:30

तालुक्यातील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक व प्राचीन महत्व असलेल्या प्रतापगड येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर मंगळवारपासून (दि.१३) भव्य यात्रेला सुरुवात होत आहे.

Pratapgad hillock symbolizes national integration | राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक प्रतापगड पहाडी

राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक प्रतापगड पहाडी

Next
ठळक मुद्देसीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर : प्रशासनाची जय्यत तयारी

संतोष बुकावन ।
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : तालुक्यातील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक व प्राचीन महत्व असलेल्या प्रतापगड येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर मंगळवारपासून (दि.१३) भव्य यात्रेला सुरुवात होत आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही लाखो भाविक कपाळावर मळकट, हातात त्रिशूल व मुखी ‘महादेवाला जातो गा’ चा गजर करीत भोलेनाथाचे दर्शन घेणार आहेत.
यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून स्थानिक ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळी सुद्धा खा. प्रफुल्ल पटेल यांच्यावतीने मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमी तथा माजी खा. नाना पटोले मित्र परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रतापगड भोलेनाथाचे तिर्थस्थान आहे. तसेच हजरत ख्वाजा उस्मान गनी हारुणी बाबाचा दर्गा आहे. त्यामुळे हे तिर्थस्थळ हिंदू-मुस्लिम बांधवाच्या एकतेचे श्रद्धास्थान असून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे. येथे उंच पहाडावर महादेवाचे मंदिर व भोलेनाथाची विशाल मूर्ती आहे. एकीकडे महादेवाचे दर्शन तर दुसरीकडे अल्लाच्या दर्ग्यावर चादर चढवून आपली मनोकामना पूर्ण करण्याचा दूहेरी योग भााविकांना लाभत आहे. यात्रास्थळी गुन्हेगारी व गैरप्रवृत्तींना आळा बसण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
प्रतापगडला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. मराठे राजे रघुजी भोसले यांच्या अधिपत्याखाली वैनगंगा प्रांतात प्रतापगड होता, असा इतिहास आहे. भोसले यांनी १७४३ च्या सुमारास राजखानला शिवजीचा दिवान म्हणून नियुक्त केले होते. तेव्हा राजखानचा मुलगा महंमद खान याने प्रतापगडचा कारभार सांभाळला. प्रतापगड येथील प्राचीन नक्षीदार बालाजी खांब हा मराठा संस्कृतीचा तर येथे असलेला हजरत ख्वाजा उस्मान गणी हारुनी बाबाचा दर्गा मुस्लीम संस्कृतीची साक्ष देतात.
एवढ्याच याचा इतिहास नाही तर पेंढाऱ्यांच्या होत असलेल्या त्रासापासून जनतेचे रक्षण करण्यासाठी येथे किल्ला बांधण्यात आला. आजही किल्ल्याचे भग्नावशेष व पहाडावर मोठ्या हौदाचे बांधकाम दिसून येते. यावरुन वैनगंगा प्रांतातील प्रतापगड एकेकाळी समृद्ध, संपन्न व मानवजातीचे वास्तव्य असलेला महत्वाचे केंद्र असावा, असे लक्षात येते. किल्ला जरी भग्नावस्थेत असला तरी येथे असलेल्या दऱ्या व पळवाटा आजही कुतुहल वाढविणाऱ्या आहेत.
या प्राचीन प्रतापगड स्थळाला महाराष्ट्र शासनाने सन २००१ मध्ये पर्यटन स्थळाचा दर्जा दिला. या स्थळाचा कायापालट करण्याच्या दृष्टीने तत्कालीन आमदार व माजी खासदार नाना पटोले यांनी प्रयत्न केले. रस्ते, भक्तनिवास, पहाडावर चढण्यासाठी पायऱ्या असा चौफेर विकास केला. सोबतच २००२-०३ च्या सुमारास पहाडावर भोलेनाथाची विशाल मूर्ती स्थापन केली व महाप्रसादाचे आयोजन सुरू केले.
तसेच राज्यसभा सदस्य प्रफुल पटेल यांनीही लाखोंचा निधी देवून दोन्ही तिर्थक्षेत्रांचा विकास केला. तसेच मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या वतीने महाप्रसाद सुरू केला. या विभागाचे आमदार तथा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी या दोन्ही तिर्थक्षेत्रांचा कायापालट करण्याचा विडा उचलला असून पर्यटन विकासाच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी आणूण विकास केला आहे. यापूर्वी बडोले यांनी यात्रेसंदर्भात नियोजन समितीची बैठक घेवून सर्व सोयी पुरविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
प्रतापगडच्या ऐतिहासिक यात्रेला यावर्षी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल, माजी खा. नाना पटोले, वर्षा पटेल, माजी आ. राजेंद्र जैन यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी भोलेनाथाचे दर्शन घेवून दर्ग्यावर चादर चढविणार आहेत.
१३ फेब्रुवारीपासून सुरु होणाºया महाशिवरात्रीयात्रेसह हजारो भाविक व पर्यटक जवळच असलेल्या तिबेटियन बौद्ध संस्कृती, बंगाली संस्कृती, इटियाडोह धरण, नवेगावबांध राष्टÑीय उद्यान, बोंडगावदेवीची गंगा-जमुना माता व अल्लाचे दर्शन घेतात व नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आनंद लूटतात.
प्रतापगडमध्ये ऊर्सनिमित्त अल्लाचा गजर, दुय्यम कव्वाली, महाशिवरात्री यात्रेसोबत १४ फेब्रुवारीपासून ५२ व्या सालाना ऊर्स शरीफनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. दुपारी शाही संदल काढण्यात येणार आहे. यावेळी विविध धर्मातील मान्यवर व भाविक दर्ग्यावर चादर चढविणार आहेत. १५ फेब्रुवारीला विविध कार्यक्रमानंतर रात्री ९ वाजता बंगलुरू येथील प्रख्यात कव्वाल मुराद आतिश व मुंबईचे दानिश इकबाल साबरी यांची कव्वाली होणार आहे.
प्रतापगडच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी मंजूर
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात हे ऐतिहासिक प्रतापगड येत आहे. त्यामुळे शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून प्रतापगड तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी ४ कोटी ८८ लाख ४१ हजारांच्या निधीला ६ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या शासन निर्णयाने मंजुरी मिळाली आहे. तसेच ५० लाखांचा निधी तातडीने देण्यात आला आहे. या निधीमधून प्रसाधन गृह, उपहार गृह, संरक्षण भिंत, प्रवेशद्वार व सिक्युरिटी कॅबीन, लॉन, गार्डन, जमीन विकास, वाहनतळ, पदपथ, पाईप लाईन, पोहोच रस्ता, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण, ४ हायमास्ट लाईट आदी विकास कामांचा समावेश आहे.

Web Title: Pratapgad hillock symbolizes national integration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.