जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 06:00 AM2020-02-07T06:00:00+5:302020-02-07T06:00:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून गुरूवारी (दि.६) सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली. गोंदियासह, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून गुरूवारी (दि.६) सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली. गोंदियासह, आमगाव, गोरेगाव, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, सालेकसा तालुक्यात जवळपास तासभर पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका शासकीय धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला आणि रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांना बसला.त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढवले आहे.
हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील दोन दिवस परतीचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यातच जिल्ह्यात बुधवारपासून ढगाळ वातावरण आहे. गुरूवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.
सकाळी १० वाजताच्या सुमारास परतीच्या पावसाने सर्वत्र हजेरी लावली. जिल्ह्यात गुरूवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १४.८० मि.मी.पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यात सध्या जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदी सुरू आहे.
त्यामुळे खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धान विक्रीसाठी आणला आहे. या धानाला गुरूवारी झालेल्या परतीचा पावसाचा फटका बसला.
पावसामुळे धान भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर रब्बी हंगामातील १० हजार हेक्टरमधील गहू आणि हरभरा या पिकांना देखील मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यामुळे खरीपापाठोपाठ रब्बी हंगामाला सुध्दा मुकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
त्यामुळे अनेकांनी शेकोट्या पेटवून ऊब घेत असल्याचे चित्र सुध्दा पाहयला मिळाले. हवामान विभागाने पुढील दोन दिवस पुन्हा परतीचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे.
कचारगड यात्रेला पावसाचा फटका
दर्रेकसा : समस्त आदिवासी बांधवाचे श्रद्धास्थान असलेल्या सालेकसा तालुक्यातील कचारगड यात्रेला शुक्रवारपासून (दि.७) सुरूवात होत आहे.या यात्रेकरिता बुधवारपासूनच भाविक यात्रा स्थळी येण्यास सुरूवात झाली. आंध्रप्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड या राज्यातील भाविक बुधवारीच यात्रास्थळी दाखल झाले होते. तर यात्रास्थळी भाविकांसाठी मंडप उभारण्यात आले आहे.याला गुरूवारी झालेल्या पावसाचा फटका बसला.त्यामुळे यात्रेकरुंची गैरसोय झाली.
सर्वत्र पाऊस जनजीवन विस्कळीत
सोनपुरी : गुरूवारी सकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे सोनपुरी परिसरातील जनजिवन विस्कळीत झाले होते.गुरूवारी सोनपुरी येथे बाजार भरत असल्याने याला सुध्दा पावसाचा फटका बसला. तर गहू आणि हरभरा पिकाचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकºयांवर आर्थिक संकट ओढावले आहे.
पावसामुळे शेतकरी संकटात
सुकडी-डाकराम : गुरूवारी सकाळी परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे परिसरातील शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. रब्बी हंगामातील लाखोळी, जवस, हरभरा, पीक फुलावर आले असून त्याला परतीच्या पावसाचा फटका बसला. तर भाजीपाला पिकांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाऊस व थंडीमुळे रब्बीतील पिकांवर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा चिंतातूर असल्याचे चित्र आहे.
साखरीटोला परिसरात तासभर पाऊस
साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील साखरीटोला (सातगाव) येथे गुरूवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने वातावरणात गारवा वाढला. तासभर झालेल्या पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. परतीच्या पावसामुळे रब्बीतील पिकांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेले धान भिजल्याने शेतकºयांचे नुकसान झाले.यावर्षी थंडीच्या दिवसात वेळोवेळी पाऊस पडत असल्याने १९९४ ला अशीच परिस्थिती होती असे काही जाणकार शेतकरी सांगतात.
गोरेगाव तालुक्यात पावसाची रिपरिप
गोरेगाव : तालुक्यात गुरूवारी सकाळी आठ वाजतापासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. जवळपास दीड तास पाऊस झाल्याने रस्त्यावर आणि शेतातील बांध्यामध्ये पाणी साचल्याचे चित्र आहे. या पावसचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांना बसला.ढगाळ वातावरण आणि पावसामुळे या पिकांवर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.दिवसभर पावसाची रिपरिप असल्याने जनजिवन काही प्रमाणात प्रभावित झाले होते.