घाटकुरोडा-घोगरा, देव्हाळा रस्त्याची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 09:36 PM2019-08-04T21:36:18+5:302019-08-04T21:36:31+5:30
पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत लाखो रुपये खर्चून वर्षभरापूर्वीच तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा-घोगरा ते देव्हाळा या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते.मात्र अल्पावधीत या रस्त्याची दुर्दशा झाली असून पायी चालने सुध्दा अवघड झाले आहे. या रस्त्याची अद्यापही दुरूस्ती न केल्याने विद्यार्थी आणि या मार्गावर ये-जा करणाºया गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंडीकोटा : पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत लाखो रुपये खर्चून वर्षभरापूर्वीच तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा-घोगरा ते देव्हाळा या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते.मात्र अल्पावधीत या रस्त्याची दुर्दशा झाली असून पायी चालने सुध्दा अवघड झाले आहे. या रस्त्याची अद्यापही दुरूस्ती न केल्याने विद्यार्थी आणि या मार्गावर ये-जा करणाऱ्या गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा परिसरात सर्वात मोठे रेती घाट आहे. त्यामुळे या रेतीघाटावरुन रेती वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांची दिवसभर वाहतूक सुरू असते. वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक केली जात असल्याने हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यावर खड्डे पडून चिखल तयार झाले आहे.त्यामुळे खरोखरच येथे रस्ता आहे का असा प्रश्न पडतो. रेती भरलेले ट्रक घाटकुरोडा, घोगरा ते देव्हाळा या रस्त्याने निघून सरळ मार्गाने नागपूर ते गोंदियाकडे जातात. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रस्ते फूटून जीर्ण झालेले आहेत. त्या खड्यात पावसाचे पाणी साचून राहत असल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. हा रस्ता एकेरी असल्यामुळे अनेक नागरिक रस्त्याच्या कडेला थांबून वाहने जाईपर्यंत प्रतीक्षा करतात. या रस्त्याने घाटकुरोडा येथील अनेक नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी ये-जा करतात मात्र रस्त्याच्या दुर्दशेमुळे त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो.
देव्हाळा येथे एलोरा पेपर मिल असल्यामुळे बरेच कामगार या पेपरमिलमध्ये कामावर जात असतात. पण हा रस्ता खराब झाल्यामुळे कामगारांना सुध्दा या मार्गावरुन ये-जा करणे कठीण झाले आहे. याच मार्गावरुन घोगरा, घाटकुरोडा ते तिरोडा-तुमसर आगाराची एसटी बस सुरु आहे. मानव विकास योजनेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी बस सुरु आहे. पण ती देखील खराब रस्त्यामुळे बंद होण्याच्या मार्गावर आहे. घाटकुरोडा येथील बरेच व्यावसायीक आपला भाजीपाला घेवून गोंदिया ते नागपूरकडे जातात. त्यांना सुध्दा रस्त्याच्या दुर्दशेचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींनी याची दखल घेवून रस्त्याची समस्या मार्गी लावण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.