इच्छुकांकडून सुरू झाली निवडणुकीची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 05:00 AM2022-03-07T05:00:00+5:302022-03-07T05:00:02+5:30
नवरात्र व दिवाळीपासूनच इच्छुकांनी आपली तयारी दाखविण्यास सुरूवात केली होती. मात्र, मध्येच जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायतीच्या निवडणुका आल्या व त्या लांबलचक चालल्या. परिणामी नगर परिषदेच्या निवडणुका पुढे सरकत गेल्या. अशात इच्छुकांनी स्वत:ला आवरून घेतले होते. मात्र, आता प्रभाग रचनेचा कार्यक्रम येताच त्यांना निवडणुकीसाठी पुन्हा हुरूप आल्याचे दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायतीच्या निवडणुका आटोपल्या असून, आता पाळी आहे ती नगर परिषद निवडणुकांची. त्यासाठी सध्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम आला असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने निवडणूक कार्यक्रम सुरू होणार आहे. अशात आता नगर परिषद निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, इच्छुक तयारीला लागल्याचे दिसत आहे. यासाठी होर्डिंगबाजी व कार्यक्रमांचे आयोजन करून ते आपली तयारी दाखवून देत आहेत.
९ फेब्रुवारी रोजी नगर परिषदेचा कार्यकाल संपला असून, सध्या प्रशासक कारभार पाहात आहेत. अशातच आता प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरू झाला आहे. म्हणजेच, नगर परिषद निवडणुकीचे कामकाज सुरू झाल्याचे दिसत आहे.
यामुळेच आतापर्यंत शांत असलेल्या इच्छुकांकडूनही तयारी असल्याचे दाखवून दिले जात आहे. यासाठी त्यांनी भेटीगाठी सुरू केल्याचे दिसत आहे. शहरात प्रत्येकच भागात सध्या यातूनच होर्डिंगबाजीसुद्धा वाढल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय येणारा प्रत्येकच कार्यक्रम व विशेष दिवसांना टिपून घेत कार्यक्रमांच्या आयोजनावर भर दिला जात आहे. जेणेकरून नागरिकांच्या नजरेत येण्यासाठी इच्छुकांची धडपड सुरू आहे.
विशेष म्हणजे, नवरात्र व दिवाळीपासूनच इच्छुकांनी आपली तयारी दाखविण्यास सुरूवात केली होती. मात्र, मध्येच जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायतीच्या निवडणुका आल्या व त्या लांबलचक चालल्या.
परिणामी नगर परिषदेच्या निवडणुका पुढे सरकत गेल्या. अशात इच्छुकांनी स्वत:ला आवरून घेतले होते. मात्र, आता प्रभाग रचनेचा कार्यक्रम येताच त्यांना निवडणुकीसाठी पुन्हा हुरूप आल्याचे दिसत आहे.
तिकिटसाठी इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न
- निवडणूक लढायची असल्याने आता तिकीट लागणार आहे. करिता आता इच्छुकांकडून येणाऱ्या प्रत्येकच सणवार व दिनविशेष व कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर भर दिला जात आहे. यात स्वत:च्या जन्मदिनापासून थोर व्यक्तींची जयंती-पुण्यतिथी, सणवारात महाप्रसाद हे सध्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. एवढेच नाही तर सध्या सुरू असलेले रस्ते-नाल्या व भूमिगत गटार योजनेच्या कामाच्या ठिकाणी उभे राहून काही नेतेमंडळीसुद्धा त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
चौकाचौकात वाढली गर्दी
- नगर परिषद निवडणूक लढण्यासाठी उतावीळ इच्छुकांकडून सध्या सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत चौकाचौकांत टोळके जमवून जनसंपर्क साधला जात असल्याचे दिसत आहे. कधी कुणासोबत न बोलणारे व चौकात न दिसणारेही आता चौकात टोळक्यांमध्ये उभे असताना दिसत आहेत. यातून ते आपली तयारी दाखवित असले तरीही लोकांना हे चांगल्याने समजून येत आहे.