प्रवेशोत्सवासाठी शाळा सज्ज

By admin | Published: June 25, 2016 01:48 AM2016-06-25T01:48:00+5:302016-06-25T01:48:00+5:30

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्रत्येक बालकाचे नाव पटावर नोंदवले जाणे आवश्यक आहे.

Prepare for school for the entrance festival | प्रवेशोत्सवासाठी शाळा सज्ज

प्रवेशोत्सवासाठी शाळा सज्ज

Next

विविध उपक्रम : शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह गावकऱ्यांचा राहणार सहभाग
गोंदिया : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्रत्येक बालकाचे नाव पटावर नोंदवले जाणे आवश्यक आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे. त्यानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी नव्याने प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत व्हावे, शाळेचे वातावरण चैतन्यमय,उत्साहवर्धक राहण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत शाळा सुरु होण्याच्या पूर्व दिनी व शाळेच्या पहिल्या दिवशी विविध उपक्रम घेण्यात येणार आहे. पटावर नोंदवले गेलेले प्रत्येक बालक दररोज शाळेत उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याचा हक्क आता कायद्याने मान्य केला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी व प्रभावी अंमलबजाणीसाठी गटशिक्षणाधिकारी यांना तालुक्यातील १०० टक्के शाळा भेटीचे नियोजन करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा स्तरावर या महत्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमात शिक्षण विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या इतर विभागातील वर्ग २ व त्यावरील अधिकाऱ्यांना या कार्यक्रमासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा भेटीचे नियोजन करण्यात आले आहे. सदर अधिकारी तालुक्यातील किमान २ ते ३ शाळांना भेटी देणार आहेत. शाळा सुरू होण्याच्या पूर्व दिनी शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था तसेच स्थानिक सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने शाळेत नव्याने प्रवेशित होणाऱ्या बालकांच्या घरी भेट देणे, पदयात्रा व शाळा परिसर स्वच्छता-सुशोभीकरण करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रभातफेरी काढून नवागतांचे स्वागत करण्यात येऊन विद्यार्थ्यांना कोऱ्या करकरीत नवीन मोफत पाठ्यपुस्तक देण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व बालके गणवेषामध्ये येणार आहेत. मध्यान्ह भोजनामध्ये गोड पदार्थाचा समावेश करण्यात येणार आहे. नव्याने प्रवेशित होणाऱ्या भरतीस पात्र विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जिल्हा परिषदेच्या सुसज्ज शाळांमध्ये मंगलमय उत्साहाच्या शैक्षणिक वातावरणात विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा संगणीकृत युगात योग्य वाटचाल करण्यासाठी यशस्वी प्रयत्न जिल्हा परिषद प्रशासनाकडून केले जात आहे. शाळा संगणक, डिजिटल, अ‍ॅक्टीवीटी बेस लर्निंग शाळा करण्यात येत आहे. गुढी पाडव्याच्या शुभ-मूहुर्तावर जिल्हाधिकारी यांच्या प्रेरणेने १०७० शाळांमध्ये ८ एप्रिल २०१६ ला गुडीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर एकाच दिवशी ९०६१ भरतीस पात्र बालके दाखल करण्यात आली. विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी ज्ञानरचनावादी पद्धतीतून अध्यापन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढावा याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये ज्ञानरचनावादाला तंत्रज्ञानाची साथ देण्यात येत आहे. त्यामध्ये अनेक शाळा लोकसहभागातून डिजिटल होत आहेत.
जिल्ह्यात एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये याकरीता सर्व गटशिक्षणाधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत. मुख्य कार्यकारी अखिकारी यांच्या आदेशान्वये सर्व मुख्याध्यापकांना शाळा प्रवेशोत्सवाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व जि.प. सदस्य, सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापकांना देण्यातआले आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Prepare for school for the entrance festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.