केशोरी परिसरात पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:19 AM2021-07-22T04:19:15+5:302021-07-22T04:19:15+5:30
केशोरी : गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती व त्यामुळे या परिसरातील धान रोवणी खोळंबली होती. मात्र ...
केशोरी : गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती व त्यामुळे या परिसरातील धान रोवणी खोळंबली होती. मात्र मंगळवारी दुपारपासून पावसाने हजेरी लावली असून, शेतकऱ्यांनी धान रोवणीला परत सुरुवात केली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मृग नक्षत्र वगळता आद्रा नक्षत्र पूर्णपणे कोरडाच गेले. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण दिसून येत होते. या परिसरात कोरडवाहू शेती मोठ्या प्रमाणात असली तरीही शेतकऱ्यांनी शेतात बोअर करून सिंचनाची व्यवस्था करून धानलागवड केली आहे. ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांची धानरोवणी सुरू होती. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची धानरोवणी खोळंबली होती. धानपिकासाठी पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. मात्र वरुणराजा रुसून बसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागून होत्या व ते पाऊस पडण्याची वाट बघत होते. मंगळवार दुपारनंतर या परिसरात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंद दिसून येत असून ज्यांची रोवणी खोळंबली होती त्यांनी रोवणी सुरू केली आहे.