जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 09:20 PM2019-08-13T21:20:32+5:302019-08-13T21:22:02+5:30
गेल्या दोन तीन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव आणि केशोरी या महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. तर मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९.३६ मि.मी.पावसाची नोंद झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गेल्या दोन तीन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव आणि केशोरी या महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. तर मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९.३६ मि.मी.पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर मंगळवारी दुपारपासून सर्वत्र दमदार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे शहरातील रस्त्यावर पाणी साचले होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने येत्या २४ तासात जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे ४ दरवाजे ०.३० मिटरने उघडण्यात आले.त्यामुळे बाघ नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
आॅगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून पावसाला सुरूवात झाल्याने जिल्ह्यातील पिकांना दिलासा मिळाला. तर शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट सुध्दा टळले आहे. मात्र मागील दोन तीन दिवसापासून पावसाने उघडीप घेतली होती. त्यामुळे जिल्ह्यातील रोवणीच्या कामाला सुध्दा वेग आला होता.पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात सुध्दा वाढ झाली होती. त्यानंतर सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाने सर्वत्र हजेरी लावली.
देवरी, तिरोडा, आमगाव तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील दोन महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. मंगळवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास शहरासह जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. सडक अर्जुनी आणि गोरेगाव तालुक्यात जवळपास चार ते पावसाने हजेरी लावल्याने या तालुक्यातील नदी नाले भरुन वाहत होते. काही नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने मार्ग बंद झाले होते. अर्जुनी मोरगाव, तिरोडा,सालेकसा,आमगाव आणि देवरी तालुक्यात सुध्दा पावसाची रिपरिप कायम होती.पावसामुळे रोवण्यांना सुध्दा संजीवनी मिळाली असून बळीराजा सुखावला आहे.
जिल्ह्यात रेड अर्लट
हवामान विभागाने मंगळवार आणि बुधवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून रेड अर्लट जाहीर केला आहे.जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाचा जोर कायम असल्याने सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे ४ दरवाजे मंगळवारी सायंकाळी ०.३० मीटरने उघडण्यात आले होते. शिवाय यामुळे बाघ नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली असून नदीकाठा लगतच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.