गारांसह अवकाळी पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 05:00 AM2021-12-29T05:00:00+5:302021-12-29T05:00:02+5:30
पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकाचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रबी पिकाचीसुद्धा लागवड केली जाते. यंदा धानपिकांवर विविध किडरोगांनी आक्रमण केल्याने धानाच्या उत्पादनात ४० टक्क्यावर घट झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्चसुद्धा भरून निघाला नाही. खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरून काढू या अपेक्षेने शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची आणि भाजीपाल्याची लागवड केली होती, पण निसर्ग पुन्हा शेतकऱ्यांवर कोपला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मंगळवारी (दि.२८) सकाळपासूनच ढगाळ वातावरण असतानाच सायंकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास अचानकच गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
हवामान विभागाने मंगळवारपासून पुढील दोन दिवस जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला होता. तो अंदाज खरा ठरत सायंकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. गाेरेगाव, तिरोडा, गोंदिया, आमगाव या तालुक्यांतही गारपीट व अवकाळी पावसाने झोडपून काढले.
पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकाचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रबी पिकाचीसुद्धा लागवड केली जाते. यंदा धानपिकांवर विविध किडरोगांनी आक्रमण केल्याने धानाच्या उत्पादनात ४० टक्क्यावर घट झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्चसुद्धा भरून निघाला नाही. खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरून काढू या अपेक्षेने शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची आणि भाजीपाल्याची लागवड केली होती, पण निसर्ग पुन्हा शेतकऱ्यांवर कोपला. मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हरभरा, गहू, लाखोरी, जवस, मोवरी, तूर व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
वातावरणात वाढला गारवा
- अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वातावरणात गारवा वाढल्याने पुन्हा थंडी वाढली आहे. त्यामुळे मंगळवारी दिवसभर हुडहुडी कायम होती, तर सकाळी स्वेटर आणि सायंकाळी रेनकोट असाच अनुभव जिल्हावासीयांना आला. हवामान विभागाने पुन्हा दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली असल्याने अवकाळीचे संकट कायम आहे.
या परिसराला बसला फटका
- मंगळवारी दुपारी ४.४५ वाजताच्या दरम्यान अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. हरभरा, गहू, लाखोरी, जवस, मोवरी व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारपीेट आणि अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका तिरोडा तालुक्यातील सुकडी डाकराम, बोदलकसा, बुचाटोला, पिंडकेपार, रूस्तमपूर, आलेझरी, बालापूर, मेंढा, ठानेगाव, खडकी, डोंगरगाव, इंदोरा, निमगाव, मेंदीपूर, भिवापूर, गराडा, चिखली, खमारी, मलपुरी आणि गोरेगाव, गोंदिया या तालुक्यांना बसला.