सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:30 AM2021-05-08T04:30:39+5:302021-05-08T04:30:39+5:30
गोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, शुक्रवारी (दि. ७) सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात अवकाळी ...
गोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, शुक्रवारी (दि. ७) सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. अवकाळी पावसाचा फटका रब्बी हंगामातील कापणी केलेल्या धानाला बसल्याने बळीराजा चिंतातुर आहे.
हवामान विभागाने जिल्ह्यात ९ मे पर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गुरुवारी सुद्धा सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती, तर शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. जवळपास १० ते १५ मिनिटे पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून त्रस्त असलेल्या जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला. मात्र या अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातील रब्बी हंगामातील कापणी केलेल्या धानाला बसला आहे. जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात २५ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. सध्या या धानाची कापणी सुरू असून, बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात धान कापणी करून पडलेला आहे. या धानाला दोन दिवसांपासून येत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना तूर्तास धानाची कापणी न करण्याचा सल्ला दिला आहे.