सध्याच ३८८ गावांवर पाणीटंचाईचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 09:22 PM2017-12-24T21:22:42+5:302017-12-24T21:23:06+5:30
यंदा जिल्ह्यात सरासरीच्या ५२ टक्के पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात मोजकाच पाणीसाठा आहे. त्याचाच परिणाम भूजल पातळीवर झाला असून २ मीटरने भूजल पातळी खालावली आहे.
अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदा जिल्ह्यात सरासरीच्या ५२ टक्के पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात मोजकाच पाणीसाठा आहे. त्याचाच परिणाम भूजल पातळीवर झाला असून २ मीटरने भूजल पातळी खालावली आहे. जानेवारी ते जून महिन्यादरम्यान जिल्ह्यातील ३८८ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने वर्तविली आहे.
यावर्षी कमी पाऊस झाल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात होती. तो अंदाज काहीसा ठरत आहे. जिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाव, देवरी, गोंदिया तालुक्यातील काही गावांमध्ये आत्तापासूनच गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
उन्हाळा सुरू होण्यास अजुन दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र त्यापूर्वीच गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने भर उन्हाळ्यात काय होणार अशी चिंता आत्तापासूनच सतावित आहे.
भूजल सर्वेक्षण विभागाने दिलेल्या अहवालाच्या आधारावर जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाणी टंचाईचा आराखडा तयार केला आहे. त्यात जिल्ह्यात जानेवारी ते जून महिन्यादरम्यान ३८८ गावे आणि वाड्यामध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पाणी टंचाईची समस्या होणाऱ्या गावांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
भूजल सर्वेक्षण विभागाने डिसेंबर महिन्यात केलेल्या निरीक्षण विहिरींच्या सर्वेक्षणात भूजल पातळी २ मीटरने खालावली असल्याचे म्हटले आहे. मागील पाच वर्षांच्या कालावधी प्रथमच डिसेंबर महिन्यात भूजल पातळी २ मीटरने खालावल्याने यंदा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईच्या तीव्र समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
उपाय योजनासाठी १ कोटी १० लाखांची तरतूद
जिल्ह्यातील ३८८ गावांमध्ये निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या लक्षात घेवून यावर उपाय योजना करण्यासाठी जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने १ कोटी १० लाख रुपयांच्या कामाचा आराखडा तयार केला आहे. हा आराखडा मंजुरीसाठी जिल्हाधिकाºयांकडे पाठविल्याची माहिती आहे.
चार तालुक्यात समस्या अधिक
यंदा पाणी टंचाईची सर्वाधिक झळ तिरोडा, गोरेगाव, देवरी आणि गोंदिया तालुक्यातील १५० गावांना बसण्याची शक्यता आहे. तालुक्यातील भूजल पातळी सर्वाधिक खालावली आहे. त्यामुळे मार्च ते जून महिन्यांमध्ये तालुक्यात पाणी टंचाईची समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता भूजल सर्वेक्षण विभागाने वर्तविली आहे.
काही गावांत
आत्तापासूनच टंचाई
तिरोडा आणि गोरेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये आत्तापासूनच पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. त्यामुळे सकाळपासूनच महिला पाण्यासाठी दूरवर भटकंती करीत असल्याचे चित्र आहे.
गोंदिया शहराची भिस्त पुजारीटोलावर
गोंदिया शहराला वैनगंगा नदीवर डांर्गोलीजवळ उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र डिसेंबर महिन्यातच वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यापासून शहरात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर मात करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाने पुजारीटोला धरणावरुन शहराला पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.